www.24taas.com, नाशिक
राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीन नाशिकमध्ये दोन दिवसीय धान्य, खाद्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. शेतक-यांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचत असल्यानं शेतकरी आणि ग्राहक दोन्ही समाधानी आहेत.
महागाईनं होरपळून निघणा-या नाशिककरांना दिलासा देणारा खाद्य महोत्सव नाशकात सुरु झालाय. राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय धान्य, भाजीपाला आणि खाद्य महोत्सवात अकोला, बुलडाणा, ठाण्यासह नाशिक जिल्ह्यातले शेतकरी सहभागी झालेत.
९० शेतकऱ्यांनी आपले स्टॉल उभारलेत. यात बासमती गहू, हातसडीचा तांदूळ, नागली, मोहरी, पालेभाज्या, सोयाबीन पासून पनीर, करवंदाचं लोणचं, निरगुडी तेल, विविध प्रकारची नव्या जातीची कडधान्य, बेदाणा द्राक्ष, कैरी, रामफळ असे अनेक प्रकारची सेंद्रीय शेती उत्पादने या महोत्सवात एकाच छताखाली उपलब्ध झालीत. शेतकरी आणि ग्राहक यांचा थेट व्यवहार व्हावा यासाठी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. पहिल्याच दिवशी नाशकात त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. काही प्रगतशील शेतक-यांचा यावेळी सत्कारही करण्यात आला.
महागाईच्या जमान्यातही स्वस्त भाजीपाला, धान्य खरेदीकरता आल्यानं ग्राहकांनी आनंद व्यक्त केलंय. ‘फ्रेश’ शेतीमाल आणि तो ही बाजार भावापेक्षा १५ ते २० टक्के कमी दारात उपलब्ध झाल्यानं ग्राहकांनी पहिल्याच दिवशी गर्दी केलीय. तर आडते व्यापारी यांची साखळी तुटल्याने दोन पैसे स्वस्त देवूनही शेतक-याच्या नफ्यात वाढ होत असल्याने शेतक-यांनीही समाधान व्यक्त केलंय.
एक दोन दिवस नव्हे तर कायम स्वरूपी शेतकरी आणि ग्राहकांमाधली व्यापारी आणि आडत्याची साखळी तोडून टाकावी अशी मागणी शेतकरी आणि ग्राहकांकडून होतेय.