निवडणुकीच्या तोंडावर... गडकरी विरुद्ध मुंडे

भाजपच्या नेतृत्वाने धावाधाव करून उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्यानं तूर्तास महायुतीवरील गंडांतर टळलंय. मात्र, यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपमध्येच नितीन गडकरी विरूद्ध गोपीनाथ मुंडे गट असं घमासान सुरू झालंय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Mar 13, 2014, 03:50 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपच्या नेतृत्वाने धावाधाव करून उद्धव ठाकरेंची मनधरणी केल्यानं तूर्तास महायुतीवरील गंडांतर टळलंय. मात्र, यानिमित्तानं महाराष्ट्र भाजपमध्येच नितीन गडकरी विरूद्ध गोपीनाथ मुंडे गट असं घमासान सुरू झालंय.
भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुप्त भेट घेतली आणि नव्या वादाला तोंड फुटलं. भाजपच्या व्यापक हितासाठी गडकरी-राज भेटीत मैत्रीपूर्ण चर्चा झाल्याचे कळते. मात्र, या भेटीची बातमी प्रसिद्ध होताच, `मातोश्री`वर संताप संताप झाला. `सामना`मधून खरमरीत अग्रलेख लिहून या भेटीचा पंचनामा करण्याचे फर्मान शिवसेना पक्षप्रमुखांनी मातोश्रीवरून काढलं. `सामना`मधून गडकरी आणि राज यांना डिवचण्यात आल्यानं राज ठाकरेंनीही मग लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला शिंगावर घेण्याचा निर्णय जाहीर केला.
भाजप आणि मनसे नेत्यांच्या गुप्त भेटींचे कवित्व आणखी काही दिवस सुरू राहिले. गोपीनाथ मुंडेंनीही मध्यंतरी राज यांची गुप्त भेट घेतल्याची बातमी आली. विधान परिषदेमध्ये भाजपच्या उमेदवारांचा राजमार्ग मोकळा व्हावा, यासाठी देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, आशिष शेलार अशा भाजप नेत्यांच्या कृष्णकुंजवरील फेऱ्या सुरूच होत्या. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संतापाचा पारा आणखीच चढला. शिवसेना नेतृत्वाची नाराजी एवढी वाढली की, युती तुटते की काय? अशी स्थिती निर्माण झाली. महाराष्ट्र भाजपमध्ये नक्की अधिकार कुणाला आहेत, असा चिमटा काढणारा सवाल उद्धव ठाकरेंनी आपल्या मित्रपक्षाला केला.
उद्धव ठाकरेंची मनधरणी करण्यासाठी मग भाजप नेत्यांनी मातोश्रीवर चकरा मारायला सुरूवात केली. आधी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि नंतर प्रभारी राजीव प्रताप रूडी यांना मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची समजूत काढावी लागली. महाराष्ट्र भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनाच अंतिम अधिकार असल्याचा खुलासा रुडी यांनी केला. त्यामुळं उद्धव ठाकरेंच्या प्रश्नाला उत्तर मिळालं असलं तरी भाजपमधील अस्वस्थता आणखी वाढली. भाजपचे नेतृत्व गडकरींच्या पाठीशी उभे राहिले नाही, म्हणून गडकरी गट नाराज झाला. तर महाराष्ट्राची धुरा मुंडेंकडे सोपवली असताना, फडणवीसांना सर्वाधिकार बहाल केल्याचे रूडींनी सांगितल्यानं मुंडे गटाची धुसफूसही वाढलीय. सध्या गारपीटग्रस्त भागात दौऱ्यावर असलेल्या मुंडे यांना या घडामोडींनी स्वतःच गार पडण्याची वेळ आली. प्रदेश भाजपच्या मुंबईत झालेल्या बैठकीला नेमके मुंडे गैरहजर राहिल्यानं ते नाराज असल्याची खमंग चर्चा आणखीच रंगली.
या खुलाशानंतरही भाजपमधील अंतर्गत धुसफूस यावर सध्या `चाय पे चर्चा` रंगलीय. भाजपमधला गडकरी विरूद्ध मुंडे हा तिढा कसा सुटणार, याचंच कोडं सर्वांना पडलंय. अशाच लाथाळ्या सुरू राहिल्या तर लोकसभा निवडणुकीत महायुतीची वाट लावण्यासाठी राज ठाकरेंच्या मनसेची कदाचित गरजही भासणार नाही.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.