www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीची मुंबईतल्या वरळी भागात प्रचार सभा आयोजित करण्यात आली. यावेळी, जाहीर भाषणात बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग, शरद पवार यांच्यासोबत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना यांच्यावर चांगलीच टीका केलीय. औकात दाखवाल तर गप्प बसणार नाही, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राजला ठाकरी शैलीत सडेतोड प्रत्यूत्तर दिलंय.
काय औकाद दाखवायचीय ती तेव्हा दाखव....
'उद्धवला कंटाळून शिवसेना सोडलीस तर उद्धवच्या फोनची वाट का बघतोस? बाळासाहेब असताना त्यांच्या पाठित खंजीर खूपसला... त्यांचं ऐकलं नाही तो माझं काय ऐकणार?' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मनसे अध्य़क्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मी या विषयाला इथंच माझ्यावतीनं पूर्णविराम देतोय... आणि उकरून काढायचंच असेल तर निवडणूक जिंकल्यानंतर मुळासकट उकरून काढू आपण... काय दाखवायचीय तेव्हा औकाद दाखव... ही सगळे वाघाचे बच्चे आहेत... मांजराची पिल्लं नाहीत' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय.
...पण, घरासमोर असून तू आला नव्हतास
बाळासाहेबांच्या स्मृतीदिनी सगळे मतभेद बाजूला ठेऊन शरद पवार आले होते... सगळे आले होते... पण, घरासमोर असून तू आला नव्हतास, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंवर शरसंधान साधलंय.
'शिवसेना प्रमुखांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या जिद्दीनं मी उतरलोय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. शिवसेना रिजनल पक्ष असला तरी आमचा ओरिजनल पक्ष आहे... दुसरा पक्ष फोडून तोडून, विचार चोरून पक्ष स्थापन करता येतो पण चालवता येत नाही... मुद्दे चोरणारी औलाद शिवसेनेची नाही'
...तर राजकारणातून निवृत्त होईन
'एक जरी भूखंड विकला असेल ना तर मी राजकारणातून निवृत्त होईन... बिल्डरबाजी मी नाही करत... कोण बिल्डर आहे सगळ्यांना माहित आहे... कोणाची कुणाशी पार्टनरशिप आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे...' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आपल्यावरचा भूखंड विकत असल्याचा आरोप फेटाळून लावलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.