www.24taas.com, झी मीडिया, पॅरीस
एका नव्या शोधामुळे आता, हृदयविकारग्रस्त रुग्णांचं आयुष्यही आणखी पाच वर्षांनी वाढू शकते. हा नवा शोध आहे एका कृत्रिम हृदयाचा... हे कृत्रिम हृदय माणसाला बसवलं आणि ते यशस्वीपणे कार्य करत राहिलं तर माणसाला अमरत्व प्राप्त होईल का? तो मनुष्य किती दिवस जगू शकेल? याबद्दल मात्र अजून काहीही सांगता येणं कठिण आहे.
फ्रान्समधील कारमॅट या बायोमेडिकल कंपनीने या कृत्रिम हृदयाची रचना केली आहे. हे हृदय बाहेरून लिथिअम आयन बॅटऱ्यांच्या सहाय्याने सुरू ठेवता येते. हे हृदय बसवण्याआधी रुग्णाच्या शरीरात विविध प्रकारच्या जैविक साधनांचा वापर करण्यात आला. शरीराने कृत्रिम हृदयाला नाकारू नये, यासाठी जैविक घटकांचा वापर करण्यात आला. यासाठी प्राण्यांच्या हृदयात असणाऱ्या पेशींचाही वापर केला. रुग्णाच्या शरीरात हे हृदय बसवल्यानंतर तो रुग्ण पूर्णपणे शुद्धीवर आला आणि त्याला विचारलेल्या प्रश्नांना योग्य प्रकारे प्रतिसाद देत होता.
खऱ्या हृदयाची जागा कृत्रिम हृदय घेऊ शकते व सुमारे पाच वर्षांपर्यंत चालू शकते, असा दावा या कंपनीने केला आहे. यापूर्वी तयार करण्यात आलेली कृत्रिम हृदय तात्पुरत्या वापरासाठी बनवण्यात आली होती.
कसं आहे हे कृत्रिम हृदय...
- या कृत्रिम हृदयाचे वजन एक किलोपेक्षाही कमी आहे
- ते निरोगी मानवाच्या हृदयापेक्षा सुमारे तीनपट आहे
- मानवी हृदयाच्या स्नायूंप्रमाणे या हृदयाच्या हालचाली होतात
- मानवी रक्ताच्या संपर्कात येणारा हृदयाचा भागात सिंथेटिक घटकाचा वापर नाही.
- त्या जागी प्राणीपेशींचा वापर केला गेलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.