www.24taas.com, मुंबई
देशाची शिखर बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ला (आरबीआय) सोन्याच्या वाढत्या मागणीला आळा घालणं आता महत्त्वाचं वाटू लागलंय. त्यामुळे लवकरच देशात सोन्याच्या विक्रिवर बंदी आणण्याचा विचार सध्या सुरु आहे. ही बंदी बँकांपर्यंतच मर्यादीत राहील. आरबीआयनं असा निर्णय लागू केला तर लोकांना बँकेकडून सोनं खरेदी करता येणार नाही. त्यामुळे सोनं शौकिनांना सोन्याच्या खरेदीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
रेकॉर्ड स्तरावर पोहचलेला तोटा पाहता भारतीय रिझर्व्ह बँकेनं येणाऱ्या काही दिवासांत बँकांकडून खरीदी केल्या जाणाऱ्या सोन्यावर नियंत्रण आणि प्रतिबंध येण्याची शक्यता आहे. सरकार आणि आरबीआयच्या मते, सोन्याच्या आयातीमुळे देशाचं आयात-निर्यात संतूलन बिघडत चाललंय. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरही चांगलाच परिणाम दिसून येतोय.
आरबीआयनंही सोनं खरेदीदारांना प्रोत्साहीत करण्यासाठी सोन्याशी संबंधित वित्तीय उत्पादनांच्या विक्रिचे आदेश दिलेत. तसंच बँकेकडून सोन्यावर कर्ज देण्यावरही बंदी आणली गेलीय. पण, यानंतरही परिस्थिती नियंत्रणात येत नाही हे लक्षात घेता इतर पर्यायांवर विचार सुरू आहे.