मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास!

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.

Updated: Apr 21, 2016, 08:31 AM IST
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन... २१ किलोमीटर समुद्राखालून प्रवास! title=

मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाबद्दल महत्त्वाची बातमी आहे. या बुलेट ट्रेनचा २१ किलोमीटरचा प्रवास हा चक्क समुद्राखालून होणार आहे.

ठाणे खाडी ते विरार हा बुलेट ट्रेनचा मार्ग समुद्राखालून जाणार आहे. त्यासाठी समुद्रात बोगदा तयार करण्यात येणार आहे. देशातला अशा प्रकारचा हा पहिलाच प्रकल्प आहे.

रेल्वेतल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलीय. २०१८ च्या अखेरीस बुलेट ट्रेनच्या या निर्मिती प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 

ताशी साडे तीनशेच्या स्पीडनं धावणाऱ्या बुलेट ट्रेननं मुंबई-अहमदाबाद प्रवासाला फक्त दोन तास लागणार आहेत. सध्या या प्रवासाला सात तास लागतात.

बुलेट ट्रेन तोट्याचा सौदा? 

सूत्रांच्या माहितीनुसार, बुलेट ट्रेनला फायद्यात चालवण्यासाठी भारतीय व्यवस्थापन संस्थेन काही पर्याय रेल्वेसमोर ठेवले आहेत. या अहवालानुसार रेल्वेला बुलेट ट्रेन फायद्यात चालवायची असेल तर दिवसाला किमान ८८ हजार प्रवासी वाहून न्यावे लागतील अथवा बुलेट ट्रेनला दिवसातून किमान १०० फेऱ्या माराव्या लागतील. 

'डेडिकेटेड हायस्पीड रेल्वे नेटवर्क्स इन इंडिया - इश्यूज इन डेव्हलपमेंट' या नावाने हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आलाय. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १५ वर्षांनी तिकीटाचा दर १५५ रुपये इतका ठेवण्यात आला आणि दिवसाला या ट्रेनने ८८ हजार ते १ लाख १० हजार जणांनी प्रवास केला तरच या प्रकल्पासाठी घेतलेलं कर्ज परत फेडता येऊ शकतं, असं या अहवालात नमूद केलंय.

या प्रकल्पासाठी जपानकडून भारताला सवलतीच्या दरात ९७ हजार ६३६ कोटी इतकं कर्ज मिळालंय... आणि भारताला ते ५० वर्षांत फेडावं लागणार आहे.