www.24taas.com, श्रीनगर
काश्मीरमधला मुलींचा पहिला रॉक बॅन्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘प्रगाश’ बॅन्डमधील मुलींबद्दल ऑनलाईन अपशब्द वापरणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या तीन तरुणांना पोलिसांनी अटक केलीय. सतत मिळणाऱ्या धमक्यांमुळे आणि मुस्लीम मुफ्तींच्या फतव्यामुळे ‘प्रगाश’मधील तीनही मुलींना गाण्याला कायमचा रामराम ठोकलाय.
पोलीसांनी बटमालूच्या एस.डी.कॉलनीमध्ये राहणाऱ्या इरशाद अहमद चारा याला काल रात्री अटक केलीय. संबंधित मुलींना ऑनलाईन धमकी देणाऱ्या या तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी याआधीही अनेक ठिकाणी छापेही मारले होते. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, इरशाद सोबतच दक्षिण काश्मीरच्या बिजबहेडाचा रहिवासी तारिख खान आणि मध्य काश्मीरमधल्या गंदेरबाल इथून रमीज शाह यांनाही बुधवारी अटक करण्यात आलीय.
‘प्रगाश’मधील तीनही मुलींच्या निवासस्थानाच्या परिसरात पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्यात आलीय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फेसबुक आलेल्या एकूण ९०० पोस्टपैकी २६ जणांचे पोस्टमध्ये धमक्या आणि अपशब्दांचा वापर करण्यात आला होता. या २६ फेसबूक यूजर्सच्या आयपी अॅड्रेस शोधण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत.
‘प्रगाश’ला सोशल वेबसाईटवरून आलेल्या कमेंटसची तपासणी करताना संबंधितांवर प्राथमिक कारवाई करण्यास तीन दिवसांचा विलंब लागला असंही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलंय.