www.24taas.com, इस्लामाबाद
चिमुरड्या मलाला युसूफजईवर हल्ला करण्याचा कट रचणाऱ्या दहशतवादी मुल्ला फजलुल्ला याला आपल्या ताब्यात द्यावं, अशी मागणी पाकिस्ताननं अफगाणिस्तानकडे केलीय.फजलुल्लानं अफगाणिस्तानात आपलं बस्तान मांडल्याचं समजण्यात येतंय. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्री हिना रब्बानी-खार यांनी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्या विशेष अमेरिका दूत मार्क ग्रॉसमॅन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी फजलुल्ला यांच्या ताब्याची मागणी समोर ठेवलीय.
सोमवारी, मलालावर झालेल्या हल्ल्यामध्ये फजलुल्ला हा सामील असल्याचं ग्रॉसमॅन यांनी म्हटलं होतं. त्याला काबुत आणण्यासाठी अमेरिकनं आपल्या प्रभावाचा उपयोग करावा असं देखील त्यांनी सुचवलं होतं. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, फजलुल्ला आणि त्याचे साथीदार अफगाणिस्तानातील कुनार प्रांतात लपून बसलेले आहेत. मलालावर हल्ला केल्यानंतर हे हल्लेखोर अफगाणिस्तानाला रवाना झाले होते.
पाकिस्तानचा पहिला राष्ट्रीय शांती पुरस्कार विजेती मलाला धर्मनिरपेक्षतेला अति महत्त्व देत होती, म्हणून तिला गोळी मारण्यात आली, असं स्पष्टीकरण तालिबाननं देऊन या कृत्याचं समर्थनच केलंय. सध्या, मलाला हिला इलाजासाठी ब्रिटनला नेण्यात आलंय. बर्मिघमस्थीत क्वीन एलिझाबेथ हॉस्पीटलमध्ये तिच्यावर उपचार सुरु आहेत.