मुनगंटीवारांना देवेंद्र नको, गडकरी हवेत... मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग?

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदासाटी भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मात्र सुरु झालंय.

Updated: Oct 21, 2014, 05:30 PM IST
मुनगंटीवारांना देवेंद्र नको, गडकरी हवेत... मुख्यमंत्रीपदासाठी लॉबिंग? title=

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नसलं तरी मुख्यमंत्रीपदासाटी भाजपमध्ये अंतर्गत कुरघोडीचं राजकारण मात्र सुरु झालंय.

'केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र' अशी घोषणा राज्यभर गाजत असली तरी भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी मात्र मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला सरळ सरळ बगल दिलीय.

'केंद्रीय मंत्रिमंडळात असलेल्या गडकरींनी राज्यात येऊन राज्याची धुरा सांभाळावी, ही भाजप नेत्यांची इच्छा आहे' असं मुनगंटीवार म्हणत आहेत.

मुख्य म्हणजे, विदर्भाच्या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या दमाच्या देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचं कौतुक केलं होतं... तेव्हापासून त्यांच्याच नावाचा बोलबाला मुख्यमंत्रीपदासाठी सुरू आहे. यादरम्यान, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांचं नाव या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत एव्हाना मागे पडलंय. 'महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री' म्हणून पंकजा यांच्या नावाचीही जोरदार चर्चा सुरू होती. 

भाजपच्या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याशिवाय एकनाथ खडसे, नितीन गडकरी, विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावं मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत शर्यतीत घेतली जात आहेत.  

याशिवाय, सत्तास्थापनेसंबंधी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना मुनगंटीवार यांनी 'शिवसेनेनं विनाअट पाठिंबा द्यावा... नाहीतर राष्ट्रवादीही विनाअट पाठिंबा द्यायला तयार आहे, त्याचाही विचार करता येईल' असं म्हटलंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.