अलिबाग: मध्यावधी निवडणुकांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंगळवारी संकेत दिल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते चिंतन शिबिरात बोलू लागले आहेत. भाजपला पाठिंबा देणं ही राष्ट्रवादीची घोडचूक असल्याचं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी म्हटलंय.
अलिबागमध्ये राष्ट्रवादीचं दोन दिवसांचं चिंतन शिबीर सुरु आहे. या शिबीरातील अंतर्गत बैठकीत जयंत पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. राष्ट्रवादी काँग्रेसनं निवडणूक निकाल लागताच भाजपला बिनशर्त पाठिंबा देण्याचं जाहीर केलं होतं. पण भाजपनं राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्याबाबत कोणतंच जाहीर वक्तव्य केलं नाही.
कालच्या भाषणात पवारांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यात भाजपला काय अडचण हेच कळत नाही, तसंच सरकारमध्ये धाडस नसल्याने भाजप सरकार अल्पजीवी ठरेल, असा सूचक इशाराही दिला होता. त्यामुळं बिनशर्त आणि स्थिर सरकारसाठी पाठिंबा देणाऱ्या शरद पवारांची भाषा आता कमालीची बदलील आहे. भाजपची कोंडी करुन राष्ट्रवादीचा पाठिंबा घेण्यास भाग पाडणं हेच शरद पवारांसारख्या दमदार राजकारण्याचं ध्येय असल्याचं बोललं जातं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.