पुणे : MIM चे वादग्रस्त खासदार असददुद्दीन ओवेसी पुण्यात आले आणि शिवसेनेचा प्रचंड विरोध असतानाही त्यांनी पुण्यात भाषणही केलं. दरम्यान, ओवेसी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली. त्याचवेळी पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या शिवसैनिकांची धरपकड केली. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ओवेसी यांनी हल्लाबोल केला.
कोंढवा भागात झालेल्या मुस्लिम आरक्षण परिषदेत खा. ओवेसी यांनी मुस्लिमांचे प्रश्न मांडताना, केंद्र आणि राज्य सरकारवर टीकेचा जोरदार भडीमार केला. सरकारमध्ये तसंच पोलिसांमध्ये एकही मुस्लिम उच्चपदावर का नाही, असा सवाल करतानाच सब का साथ सबका विकास म्हणणारे मुस्लिमांना आरक्षण देणार का? अशी विचारणा ओवेसींनी केली.
मी लंडनची शेरवानी परीधान केली नाही. मी मेड इन इंडिया कमीज घातलेली नाही, असं सांगून देशातल्या गोरगरीब मुस्लिमांच्या अंगावर कपडा नको का, असा सवालही त्यांनी पंतप्रधानांना केला. मी भडक भाषण देतो म्हणतात. मला शिव्या देतात, माझी हरकत नाही. त्यावरच त्यांची रोजीरोटी चालते, असा टोलाही ओवेसींनी लगावला.
माझं भाषण शांतपणं ऐका, नाहीतर मला पोलीस अटक करून येरवड्यात टाकतील. मला फर्लो पण मिळणार नाही. तो फक्त स्टार लोकांना मिळतो. जेलमध्ये राहून ते एट पॅक्स बनवतात, अशा शब्दांत त्यांनी संजय दत्तला मिळणाऱ्या सोयीसुविधींची टर उडवली.
दरम्यान, पुण्यात MIM चे खासदार ओवेसी यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार निदर्शनं केली. कोंढवा भागातील कौसरबाग मैदानावर मुस्लिम आरक्षण परिषद झाली. या परिषदेत ओवेसीनी भाषण केले. माजी आमदार महादेव बाबर यांच्या नेतृत्वाखाली कोंढवा भागातील एनआयबीएम चौकात शिवसैनिकांनी निदर्शनं केली. त्यावेळी पोलिसांनी आंदोलन करणा-या शिवसैनिकांची धरपकड केली. त्यामुळं या भागातील वातावरण चांगलंच तापले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.