www.24taas.com, मुंबई
केंद्र सरकार आणि कामगार संघटनांमधली चर्चा विफल झाल्यानंतर संघटनांनी आजपासून दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारलाय. मंगळवारी रात्रीपासूनच भारत बंदची हाक अंमलात आणली गेलीय. परंतू, मुंबईत मात्र बेस्ट बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी सेवा सुरू राहणार आहेत तसंच अत्यावश्यक सेवांवरही परिणाम होणार नाही. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी नैतिक पाठिंबा दिला असला, तरी संपात मात्र सक्रिय सहभाग घेणार नाहीत. त्यामुळे मुंबईची लाईफलाईन सुरळीत सुरू राहणार आहे. मुंबईकरांसाठी ही नक्कीच दिलासादायक बातमी म्हणावी लागेल. अत्यावश्यक सेवाही चालू राहणार आहे. शरद राव यांची रिक्षा संघटना आजच्या संपात सहभागी नाही तर क्वाड्रोज यांची टॅक्सी युनियनही संपात सहभागी नाही. संपाचा परिणाम केवळ औद्योगिक पट्ट्यात असणार आहे. तर बँक कर्मचारी संपात सहभागी असल्याने आज दिवसभर बँका बंद राहणार आहेत. मुंबईची लाईनलाईन समजली जाणारी रेल्वेही सुरळीत सुरू आहे. शरद रावांची कामगार संघटनाही या संपात सहभागी होणार नाही. सार्वजनिक वाहतूक तसंच रिक्षा, टॅक्सीही मुंबईच्या रस्त्यांवर धावताना दिसतील.
या राष्ट्रव्यापी ‘भारत बंद’मध्ये देशातील ११ अधिकृत कामगार संघटनांनी पाठिंबा दिलाय. यूपीए सरकारच्या जनविरोधी नीति आणि महागाईच्या विरोधात हा संप पुकारण्यात आलाय. ट्रेड युनियनच्या म्हणण्यानुसार सुरक्षा मंत्री ए. के. अँटनी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीकडून कोणतंही ठोस पाऊल उचलण्यात आलं नाही.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सोमवारी या कामगार संघटनांना आपला नियोजित संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका पोहचू शकतो तसंच सामान्यांनाही त्याचा त्रास होईल, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं होतं.