एकनाथ खडसे घरी बसणार, राजीनामा देण्याचे केंद्रीय पातळीवरून सूचना?

 खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या केंद्रीय पातळीवरून सूचना आल्याचे खात्रीलायक समजते. 

Updated: Jun 4, 2016, 05:50 PM IST
एकनाथ खडसे घरी बसणार,  राजीनामा देण्याचे केंद्रीय पातळीवरून सूचना? title=

मुंबई : महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर राजीनाम्याचा दबाव वाढत आहे. त्यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा देण्याच्या केंद्रीय पातळीवरून सूचना आल्याचे खात्रीलायक समजते. त्यामुळे खडसे घरी बसणार हे आता स्पष्ट झालेय.

खडसेंबाबत वरिष्ठ नेते मंडळी आणि पक्ष निर्णय घेतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत स्पष्ट केले होते. फडणवीस यांनी दिल्लीत पक्ष अध्यक्ष अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि आपला खडसेंबाबतचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर मध्यस्तीची भूमिका सोपविण्यात आली होती. त्यामुळे गडकरी यांची पंचाईत झाली होती. त्याचवेळी केंद्रीय पातळीवरून खडसे यांनी सर्व पदांचा राजीनामा द्यावा, असेही वृत्त आहे. त्यामुळे खडसे संध्याकाळपर्यंत आपल्या पदांचा त्याग करतील, अशी शक्यता आहे.

 

का खडसे आले अडचणीत?

डॉन दाऊद इब्राहिमच्या घरातून आलेला फोन कॉल, एमआयडीसीची भूखंड खरेदी, सिंचन घोटाळ्यातील आरोप आणि गजानन पाटील लाच प्रकरणामुळे खडसे अडचणीत आलेत. आता पुन्हा खडसे यांच्या अडचणी आणखीन वाढत आहेत. अनधिकृत पर्ससीन नेटधारकांना मासेमारीसाठी परवानगी देण्यासाठी खडसे यांनी ३० कोटींचा मलिदा खाल्ल्याचा गंभीर आरोप अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीने केलाय.

पाच कोटी खडसेंना दिल्याचा नवा आरोप

ट्रॉलर्सवाल्यांकडून दरमहा पाच कोटींचा हप्ता घेऊन खडसेंनी बेकायदेशीर परवाने दिल्याचा आरोपही कृती समितीने केला आहे.  पर्ससीन नेटचे मासेमारीचे परवाने नसलेल्या ७०० अनधिकृत भांडवलदारांच्या ट्रॉलर्सवाल्यांकडून खडस दरमहा पाच कोटी लाच घेत होते असा आरोप कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी केला आहे. मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त युवराज चौगुले आणि सहआयुक्त विनोद नाईक हे प्रत्येक ट्रॉलरवाल्याकडून महिन्याला एक लाखप्रमाणे सात कोटी जमा करीत होते. त्यापैकी पाच कोटी खडसेंना दिले जात होती, असा आरोप तांडेल यांनी केलाय.