मुंबई : सिने अभिनेता सलमान खान यानं हिट अँड रन खटल्यातील आपल्यावरील सर्व आरोपांचा इन्कार केलाय. वांद्र्यामध्ये सलमानच्या गाडीला अपघात झाला, त्यावेळी तो गाडी चालवत नव्हता... तर त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग गाडी चालवत होता, असं सलमान खाननं कोर्टात सांगितलं.
एवढंच नव्हे तर दुर्घटना घडली त्यादिवशी आपण दारू प्यायलो नव्हतो, असंही त्यानं कोर्टात स्पष्ट केलं. २८ सप्टेंबर २००२ रोजी सलमान खानच्या लँड क्रूझर गाडीनं वांद्रे येथील अमेरिकन बेकरीच्या फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडलं. त्यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर ४ जण गंभीर जखमी झाले होते.
याप्रकरणी सलमान खानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून खटला चालवण्याचे आदेश जून 2013 मध्ये देण्यात आले. त्यानुसार मुंबई नगर दिवाणी आणि सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झालीय. याबाबत कलम 313 नुसार जबाब नोंदवण्यासाठी सलमान खान आज कोर्टात हजर राहिला, त्यावेळी कोर्टानं त्यांना तब्बल 419 प्रश्न विचारलं. बहुतेक प्रश्नांना चूक आणि माहित नाही, अशीच सलमाननं उत्तरं दिली.
याप्रकरणी आता 30 मार्च रोजी पुढील सुनावणी होणाराय. सलमानवरील हा आरोप सिद्ध झाल्यास त्याला 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. आता कोर्ट काय निकाल देणार, याकडं सर्वांचं लक्ष लागलंय...
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.