रायगड : महाडच्या घटनेवरुन विधानसभेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं. मे महिन्यात पुलाची पाहणी झाली होती. हा पूल धोकादायक नव्हता, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अजित पवारांनी केली.
पुलाच्या सुरक्षेचा कालावधी संपलेला होता. तरी पुलावरुन वाहतूक सुरु होती. त्यामुळे या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी पृथ्वीराज चव्हाणांनी केली आहे.
महाड एमआयडीसीजवळ पूल वाहून गेल्याची धक्कादायक घटना पहाटेच्या वेळी घडली आहे. यामध्ये दोन एसटी बसेस वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पूल वाहून गेल्यानंतर आता बचावकार्य सुरू झालंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील मुख्यमंत्र्यांना फोन करुन महाड दुर्घटनेची माहिती घेतली आहे. पंतप्रधानांनी केंद्राकडून संपूर्ण मदतीचं आश्वासन दिलं आहे.
कोस्टगार्डची ४ हेलिकॉप्टर्स आणि एनडीआरएफची दोन पथक बेपत्ता झालेल्या दोन बसेसचा शोध घेत आहेत. यामध्ये २२ जण बेपत्ता असल्याची माहिती समोर येत आहे.
वाहून गेलेल्या पुलाची मे महिन्यात पाहणी झाली होती. पूल हा वाहतुकीसाठी सुरक्षित होता अशी प्रतिक्रिया सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. पालकमंत्री प्रकाश मेहता घटनास्थळी पोहोचले आहेत. मुख्यमंत्री महोदय आपत्कालीन परिस्थितीवर नजर ठेवून आहेत.