'मेक इन इंडिया'साठी झाला मुंबईचा 'मेक ओव्हर'!

'मेक इन इंडिया'चा ज्वर अवघ्या मुंबईत दिसू लागलाय. पंतप्रधानांच्या संकल्पनेसाठी जणू अवघी मुंबई नगरी सज्ज झालीय. या संकल्पनेसाठी मुंबईचा मेक ओव्हरही करण्यात आलाय. 

Updated: Feb 11, 2016, 11:06 PM IST
'मेक इन इंडिया'साठी झाला मुंबईचा 'मेक ओव्हर'! title=

दिनेश दुखंडे, मुंबई : 'मेक इन इंडिया'चा ज्वर अवघ्या मुंबईत दिसू लागलाय. पंतप्रधानांच्या संकल्पनेसाठी जणू अवघी मुंबई नगरी सज्ज झालीय. या संकल्पनेसाठी मुंबईचा मेक ओव्हरही करण्यात आलाय. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून तयार झालेली मेक 'इन इंडिया' ही संकल्पना... या संकल्पनेवर आधारित पहिला कार्यक्रम पार पडतोय तो देशाच्या आर्थिक राजधानीत... या कार्यक्रमाच्या उदघाटनासाठी आता अवघे काही तास उरलेत. त्यासाठी मुंबईही सज्ज झालीय.

मुंबईच्या नाक्या-नाक्यावर 'मेक इन इंडिया'च्या जाहिराती झळकू लागल्या आहेत. परदेशी पाहुणे यासाठी उपस्थित राहणार असल्यानं मुंबई शहराची स्वच्छता, टापटिपता याकडं विशेष लक्ष दिलं जातंय. रस्ते दुभाजकांची रंगरंगोटी सुरु झालीय. व्हीव्हीआयपी रहदारी लक्षात घेता वाहतूक यंत्रणेवर ताण येणार नाही याचीही दक्षता बाळगली जातेय. या कार्यक्रमासाठी मुंबईचा जणू 'मेक ओव्हर'च केला जातोय. महालक्ष्मी-हाजीअली जंक्शनवर उभारण्यात आलेला 'कार्पोरेट मुंबईकर' सध्या सर्वांच्याच चर्चेचा विषय बनलाय.

छत्रपति शिवाजी टर्मिनस येथील महापालिका मुख्यालयाबाहेर बसवण्यात आलेला  हा यांत्रिक सिंहही सध्या लोकांचं लक्ष वेधून घेतोय. 

'मेक इन इंडिया' अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी गिरगाव चौपाटीही सज्ज होतेय. या सोहळ्यात महानायक अमिताभ बच्चन महाराष्ट्राचे गौरवगीत गाणार आहेत, तर हेमा मालिनीही नृत्याविष्कार सादर करणार आहेत. बॉलीवूड स्टार आमीर खान, शाहरुख खान, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा असे अनेक कलावंत आपल्या अदाकारीचं दर्शन घडविणार आहेत. 

एकूणच काय सध्या मुंबईवर 'मेक इन इंडिया'चा फिव्हर चढलाय आणि या संकल्पनेच्या रंगात मुंबई रंगून गेलीय.