www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे वजा शिवसेना हा अनुभव गेल्या वर्षभरात सर्वांनीच घेतला. बाळासाहेब गेल्यानंतर गेल्या वर्षभरात शिवसेनेत अनेक स्थित्यंतर झाली.
परत या... परत या... बाळासाहेब परत या... असा शिवसैनिकांनी फोडलेला टाहो काळीज पिळवटून टाकत होता... कारण लाखो-करोडो शिवसैनिकांचा पोशिंदा त्यांना सोडून कायमचा देवाघरी गेला होता.. आपले साहेब गेले... ही भावनाच शिवसैनिकांना अस्वस्थ करून गेली. बाळासाहेब ठाकरे वजा शिवसेना ही कल्पनाच पचवणं अवघड होतं... शिवसैनिकांना आणि शिवसेना नेतृत्वालाही... शिवसेनाप्रमुख हे एकच होते आणि एकच राहणार, असं शिवसेना नेतृत्वानं पक्कं केलं.. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर खाली. परंतु ते केवळ पक्षप्रमुख बनले, शिवसेनाप्रमुख नाही....
बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे रक्ताच्या नात्यानं वडील आणि पुत्र असले तरी दोघांच्याही कार्यपद्धतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळं बाळासाहेबांचा वारसा पुढं चालवणं, हे उद्धव ठाकरेंपुढील मोठं आव्हान आहे. बाळासाहेबांनी लावलेल्या रोपट्याचा महावृक्ष झालाय, तो जोपासण्याची जबाबदारी आता उद्धव ठाकरेंवर आहे. मात्र शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री झालेल्या मनोहर जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यानंच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशींना ज्या पद्धतीनं व्यासपीठावरून घरी जावं लागलं, त्यामुळं हे प्रश्नचिन्ह आणखी गडद झालंय...
त्यातच राज ठाकरेंनी मनसेच्या रूपानं शिवसेनेची केलेली विभागणी, युतीमधील भाजपचं वाढलेलं आव्हान आणि रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवलेंचा रूसवाफुगवा अशा विविध आघाड्यांवरही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची कसोटी लागणार आहे... २०१४च्या लोकसभा निवडणुकांचं घोडामैदान जास्त लांब नाही. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर ही पहिलीच मोठी निवडणूक असणार असून, शिवसेनेच्या कामगिरीवर एनडीएचंही भवितव्य अवलंबून असणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर स्मृती उद्यान उभारण्यात आलंय... मात्र आपल्या बोटाच्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद पाडणाऱ्या शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाठी जागा मिळू नये, याची खंत शिवसैनिकांना बोचतेय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.