मतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता?

आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 21, 2017, 06:37 PM IST
मतदार याद्यांचा गोंधळ उडणार, याचा निवडणूक आयोगाला अंदाज होता? title=

मुंबई : आज बहुतेक मतदार केंद्रांवर याद्यांमध्ये नाव न सापडल्यानं मतदारांचा गोंधळ उडाला... पण, हा गोंधळ उडणार याचा निवडणूक आयोगाला अंदाजा होता का? असा प्रश्न निर्माण झालाय.

मतदार याद्यांचा घोळ

मतदार केंद्रांच्या बाहेर मतदारांना मदत करण्यासाठी आणि त्यांचं मतदान यादीत असलेलं नाव शोधून देण्यासाठी राजकीय पक्षांचे लोक किंवा सामाजिक कार्यकर्ते बसलेले असतात. आज मात्र त्यांच्याकडे असलेल्या याद्यांमध्ये आणि मतदान केंद्रांत बसलेल्या अधिकाऱ्यांकडे असलेल्या मास्टर यादीमध्ये तफावत आढळत होती. 

अनेक मतदारांना त्यांचं नाव बाहेर असलेल्या याद्यांमध्ये दिसत होतं... मात्र, मतदान केंद्रात असलेल्या यादीमध्ये मात्र त्या क्रमांकावर त्यांचं नाव नसल्यानं खूप वेळ वाया जात होता. शिवाय निवडणूक केंद्रावर असलेल्या अधिकाऱ्यांचाही त्रास वाढला होता.

मतदानाला मुकाले... 

केंद्राबाहेर असलेल्या मदत केंद्रावरच्या यादीत नाव आहे परंतु, बुथवरच्या मास्टर यादीत नाव न सापडल्यानं अनेक मतदारांची निराशा झाली... शिवाय, बाहेरच्या यादीतच नाव सापडलं नसल्यानं काही मतदार मास्टर यादीत नाव न पाहताच आणि मतदान न करताच माघारी परतले. 

निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण

केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, ही मतदार यादी नव्यानं बनवण्यात आलीय. नवीन सर्व्हे केल्यानंतर वर्षानुवर्षे याद्यांमध्ये आलेली दुबार नावं, मयतांची नावं या नव्या यादीतून वगळण्यात आली होती. यामुळे, यादीतील मतदारांची नावं कमी झाल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगानं दिलंय. 

या नव्या यादीत काही हयात असलेल्या जुन्या मतदारांचीही नावं गायब झालीत. निवडणूक आयोगानं वेबसाईटवर टाकलेल्या याद्या, मतदान केंद्रांवर असलेल्या याद्या आणि राजकीय पक्षांकडे असलेल्या मतदार याद्या यांमध्ये तफावत होती. त्यामुळे, नागरिकांना आपला यादी क्रमांक, बुथ सापडण्यास अडचण येत होती.

मास्टर यादी जाहीर का केली नाही?

मतदार केंद्रांमध्ये असलेली मास्टर लिस्ट राजकीय पक्षांकडे का दिली नाही? हा प्रश्न आहे. तसंच आता हे निस्तरण्यासाठी निवडणूक आयोगानं जिथं जास्त घोळ जाणवलेल्या बुथवर ज्यादा कर्मचारी नेमले आहेत... दुपारनंतर, हे कर्मचारी केवळ नावं शोधून देण्याचं काम करताना दिसले... परंतु, सकाळी मतदान करण्यासाठी आलेले काही नागरिक मात्र या घोळामुळे मतदान न करताच परतले, त्यांचं काय? हा प्रश्न उरतोच.