बाप्पाच्या तलाव विसर्जनाला बंदी!

एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 22, 2013, 12:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
एकिकडे संपूर्ण महाराष्ट्राला गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगर पालिकेने बाप्पाच्या सर्वच प्रकारच्या मूर्तींच्या तलावात विसर्जनावर बंदी आणली आहे. महानगर पालिकेचा हा फर्मान तुगलकी असल्याचा आरोप गणेश भक्तांनी केलाय तर विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कृत्रिम टाक्यांची निर्मिती करण्यात येणार असल्याचं महापालिकेतर्फे सांगण्यात आलंय.
संपूर्ण राज्यात गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असतानाच नागपूर महानगरपालिकेनं एक आदेश पारित करत बाप्पांच्या नागपूरकरातील भक्तांना निराश केलंय. मूर्ती विसर्जनामुळे शहरातील तलावात प्रदूषण पसरतं आणि पर्यावरण बाधित होत असल्याचं सांगत ‘प्लॅस्टर ऑफ परिस’सोबत आता शाडूच्या मूर्तींचे तलावात विसर्जन करण्यावर बंदी घालण्यात आलीय. महानगरपालिका इतक्यावरच थांबली नाही तर या मूर्तींपासून कोणत्याही प्रकारचं प्रदूषण करणार नसून दोषी आढळ्यास आपण दंडास पात्र असू अशा आशयाचं हमीपत्र मूर्ती विक्रेता आणि गणेशभक्तांकडून लिहून घेण्यात येणार आहे. त्यामुळे गणेश भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गणेश विसर्जनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून कृत्रिम टाक्यांची निर्मिती करण्यात येणार असून त्यात विसर्जनाची पुरेपूर सोय असल्याचा दावा महानगर पालिका पदाधिकाऱ्यांनी केलाय. यापूर्वीही पालिकेनं ‘प्लॅस्टर ऑफ पॅरिस’च्या मूर्ती विसर्जनावर बंदी आणली होती. मात्र, ती यशस्वी झाली नाही. त्यामुळे नागपूरातल्या तीन लाख घरगुती मूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था पालिका योग्य रितीने करेल का? असा सवाल गणेशभक्त करताना दिसत आहेत. पण, दिवसागणिक वाढत चाललेल्या प्रदूषणाचा विचार करता पर्यावरणाबाबत जागृत झालेल्या महानगरपालिकेच्या या उपक्रमला गणेशभक्तांनी सकारात्मक प्रतिसाद देण्यास काहीच हरकत नाही.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.