www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नाशिक दौ-यानंतर महापौर बदलणार या चर्चेला उधाण आलंय. नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राज यांनी महापालिकेच्या कारभारविषयी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. सत्तेत बसून काम करु शकत नसेल तर विरोधात बसलेलं कधीही चांगलं असं सुनावून राज बैठकीतून उठून गेलेत.
महापौरांवरही राज ठाकरे नाराज असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे भाजप-मनसेतही दुरावा निर्माण झाल्याने सत्तेत काही बदल होणार या चर्चेला उधाण आलंय. नरेंद्र मोदींवर जाहीरपणे टीका करून खळबळ उडवून देणारे राज ठाकरे यांचा चार दिवसांच्या नाशिक दौ-यांचा आज समारोप झालाय.
राज यांनी अवघ्या दोन तासात सात ठिकाणी भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला भेट देऊन दौरा आटोपला. सत्ताधारी भाजपने बहिष्कार टाकलेल्या या दौ-याचं, मात्र काँग्रेस नगरसेवकांनी ढोलताशे वाजवून राज यांचं जोरदार स्वागत केल्यानं राज यांच्या दौ-याचा शेवटही चर्चेचा विषय ठरलाय.
दरम्यान, महाराष्ट्रात आम्हीच बाप आहोत असं ठणकावणा-या राज ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांनी तातडीने प्रत्युत्तर दिलं होतं. आता छगन भुजबळ यांनी राज यांना टोला मारलाय. महाराष्ट्राचा बाप होण्याचं स्वप्न पाहण्यापेक्षा प्रबोधनकारांनी दिलेली शिकवण लक्षात ठेवा असं भुजबळ यांनी म्हणाले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.