www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेनं संघटनात्मक बांधणीला सुरुवात केलीय. या बालेकिल्ल्यात होत असलेली पक्षाची वाताहत थांबवण्यासाठी उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालतायत.
नाशिक महापालिका निवडणुकीत मनसेचा फडकलेला झेंडा आणि शिवसेनेचा झालेला पराभव पक्षप्रमुखांच्या किती जिव्हारी लागलाय, याचा अंदाज उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यावरुन येतोय. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या नाशिकमध्ये सलग दोन लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची पार वाट लागली.
मागच्या निवडणुकीत शिवसेनेचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. तर दीड वर्षांपूर्वी शहर कार्यकारिणी बरखास्त केल्यानंतर शिवसेनेला महानगरप्रमुख पदासाठी सक्षम आणि आश्वासक चेहरा सापडत नव्हता. अखेर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या अजय बोरस्ते यांच्या गळ्यात दुसऱ्यांदा महानगरप्रमुखपदाची माळ पडली.
तर लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ६ महिन्यांपूर्वी मनसेतून शिवसेनेत आलेल्या हेमंत गोडसे यांना नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या संघटकपदी तर महिनाभरापूर्वी शिवसेनेत दाखल झालेल्या वादग्रस्त सुहास कांदेवर विधानसभा संघटकपदाची जबाबदारी सोपवण्यात आलीय.
गेल्या लोकसभा निवडणुकांपासूनच उद्धव यांचं नाशिककडे दुर्लक्ष झालं. त्यामुळं महापालिकेतली सत्ता गेली. अंतर्गत गटबाजी वाढली आणि त्याचाच फटका शिवसेनेला बसलाय. आताही बाहेरुन आलेल्यांना महत्त्वाची पदं दिल्यानं शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याची कुजबूज आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.