माजी सहकारमंत्र्यांच्या मुलाचा `प्रताप`!

माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलगा धवलसिंह याच्याविरोधात एकाच कुटुंबातल्या तिघांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय़.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 22, 2013, 10:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर
माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटील चांगलेच अडचणीत आले आहेत. त्यांच्या मुलगा धवलसिंह याच्याविरोधात एकाच कुटुंबातल्या तिघांना जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय़. हे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा प्रतापसिंह मोहिते पाटलांनी केलाय. मात्र कॅमे-यासमोर यायला आणि फोनवर बोलायला त्यांनी नकार दिलाय.
सोलापूर जिल्ह्यातल्या अकलूजचं पवार कुटुंब... हे कोणत्या आजारामुळं रुग्णालयात दाखल झालेले नाहीत तर यांना जाळून मारण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. आणि हे अमानुष कृत्य कोण्या अट्टल गुन्हेगाराचं नव्हे तर माजी मंत्र्याच्या मुलाचं आहे. माजी सहकारमंत्री प्रतापसिंह मोहिते पाटलांचा मुलगा धवलसिंह यानं आपल्या २५ बगलबच्च्यांसह हा अमानुष प्रताप केल्याचा आरोप करण्यात आलाय. पवार कुटुंब आणि सचिन घोडके यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शेतजमिनीचा वाद होता. ज्या शेतजमिनीवरून वाद झाला ती जमीन सचिन घोडकेनं विकत घेतली होती. मात्र ही जमीन पवार कुटुंबीय कसत होते. सचिन घोडकेनं पवारांना शेतजमिनीचा ताबा सोडण्य़ास सांगितलं. पवारांनी मात्र घो़डकेला नकार दिला. त्यामुळं घोडकेनं आपले नेते धवलसिंह मोहिते पाटलांकडेच धाव घेतली. मग या प्रतापपुत्रानं आपल्या कार्यकर्त्यांसह शेतात असलेल्या पवार कुटुंबीयांना गाठून थेट जाऊन मारण्याचाच प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय. धवलसिंह मोहिते पाटलासह पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सर्वात संतापजनक म्हणजे ही अमानुष घटना घडल्यानंतर तब्बल तीन दिवस पोलिसांनी गुन्हाच दाखल केला नाही. पोलीस मोहिते पाटलांच्या दहशतीखाली असल्यामुळंच तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केलाय.
प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी हा गुन्हा राजकीय द्वेषापोटी दाखल केला असल्याचं सांगितलंय. कॅमे-यासमोर मात्र त्यांनी ही प्रतिक्रिया देण्याचं सोईस्कररीत्या टाळणं बरच काही सांगून जातं. मात्र गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणारे पोलीस धवलसिंह याच्यासह सर्व आरोपींना अटक करणार का हा खरा प्रश्न आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.