www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
वानखेडे स्टेडियमशी सचिनचं नातं तसं जुनं आहे. याच वानखेडे स्टेडियमवर सचिनने अनेक नेत्रदिपक खेळीही केल्या आहेत. मात्र, गेली १६ वर्ष या स्टेडियमवर सचिनला एकही सेंच्युरी झळकावता आलेली नाही. त्यामुळे अखेरच्या टेस्टमध्ये वानखेडेवर सेंच्युरी झळाकावण्यास सचिनचे हात नक्कीच शिवशिवत असणार.
वानखेडे स्टेडियम सचिन तेंडुलकरसाठी नेहमीच लकी ठरलं आहे. याच मैदानात सचिनचं जवळपास प्रत्येक स्वप्न पूर्ण झालं. या फ्रेंडली मैदानामुळेच सचिनचं वानखेडेशी जवळचं नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे वानखेडेवर नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्यास सचिन उत्सुक असतो. होमग्राऊंडवर आपली हुकूमत दाखवण्याकरता तर प्रत्येक खेळाडू आतूर असतो आणि जेव्हा सचिन तेंडुलकरसारखा क्रिकेटर आपल्या करिअरची अखेर होमग्राऊंडवर करणार असेल... तेव्हा तर सर्वांनाच त्याची अखेरची खेळी ‘याची देही याची डोळा’ पाहण्याची उत्सुकता लागलेली असते. स्वत: सचिनही आपली बेस्ट कामगिरी करण्यास उत्सुक असेल. वेस्ट इंडिजविरूद्ध अखेरच्या टेस्टमध्ये सचिनने सेंच्युरी झळकवावी अशीच तमाम फॅन्सची इच्छा असणार आहे. याच मैदानाच्या साक्षीने सचिनने डोमॅस्टिक आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम रचले आहेत. वन-डे वर्ल्ड चॅम्पियन बनण्याचं सचिनचं स्वप्न याच वानखेडेवर दोन वर्ष आधीच पूरं झालं आहे. आणि त्यामुळेच जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करण्याची वेळ आली तेव्हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वानखेडे स्टेडियमवर आपल्या करिअरची अखेरची मॅच खेळण्याची इच्छा व्यक्त केली.
सचिन तेंडुलकरने वानखेडेवर खेळलेल्या १० टेस्टमध्ये ४७.०५ च्या सरासरीने ८४७ रन्स ठोकून काढले. ज्यामध्ये एक सेंच्युरी आणि पाच हाफ सेंच्युरीजचा समावेश आहे. सचिनची वानखेडेवरील रन्सची सरासरी दमदार असली तरी वानखेडेवर सचिनच्या नावे १६ वर्षांपूर्वी केवळ एकमेव टेस्ट सेंच्युरीची नोंद आहे. वन-डेतही सचिनने १९९६ साली एकमेव सेंच्युरी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध झळकावली होती.
सचिन तेंडुलकरने श्रीलंकेविरूद्ध ३ डिसेंबर १९९७ रोजी १४८ रन्सची जबरदस्त खेळी केली होती. त्यानंतर मात्र सचिनला वानखेडेवर आपला सेंच्युरींचा दबदबा कायम राखण्यात अपयश आलं. त्यामुळेच आपल्या करिअरच्या संध्याकाळी वानखेडेवरील अपयश धुवून काढण्यासाठी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर नक्कीच सज्ज असणार.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.