आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज!

महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.

PTI | Updated: Jan 18, 2015, 08:13 AM IST
आजपासून भारत-ऑस्ट्रेलिया ट्रायसीरिज! title=

मेलबर्न : महिनाभरानंतर सुरू होत असलेल्या वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद राखण्यासाठी सज्ज असलेली टीम इंडिया आज ट्रायसीरिजमधील पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवून वर्ल्डकप स्पर्धेची तयारी योग्य दिशेनं सुरू असल्याचं सिद्ध करण्यास उत्सुक आहे.

तिरंगी मालिकेत भारतीय टीम प्रयोग करू शकते, पण वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीमचा समतोल साधला गेला, तर आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. नुकत्याच संपलेल्या टेस्ट सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध २-० नं पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय टीमकडून वनडे क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरीची आशा आहे. मेलबर्न क्रिकेट मैदानावर जवळजवळ दोन आठवड्यांपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच मैदानावर वनडे क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. धोनीला सर्वप्रथम सलामीच्या जोडीबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल. 

भारतीय टीम वर्ल्डकप स्पर्धेत आपल्या मोहिमेचा प्रारंभ पाकिस्तानविरुद्ध अ‍ॅडिलेडमध्ये खेळल्या जाणाऱ्या लढतीनं करणार आहे, पण त्याआधी सलामीच्या जोडीबाबत ठोस निर्णय न होणं चिंतेचा विषय आहे. आज खेळल्या जाणाऱ्या लढतीपूर्वी संघव्यवस्थापनाला शिखर धवनसोबत सलामीला अजिंक्य रहाणे की रोहित शर्मा डावाची सुरुवात करणार, याबाबत निर्णय घेता आलेला नाही. 

सलामीच्या जोडीचा निर्णय न झाल्यामुळं उर्वरित फलंदाजी क्रमावरही प्रभाव पडेल. जर रहाणे धवनसोबत डावाची सुरुवात करणार असेल, तर रोहित कुठल्या क्रमांकावर फलंदाजीला येईल? जर रोहित डावाची सुरुवात करणार असेल, तर रहाणेला चौथ्या स्थानावर फलंदाजीला पाठविलं जाण्याची शक्यता आहे. चौथ्या स्थानावर रहाणेला विशेष छाप पाडता आलेली नाही. विराटला त्याच्या पसंतीच्या तिसऱ्या स्थानावरून बढती देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.