आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का?

टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

Updated: Mar 23, 2016, 11:38 AM IST
आता तरी रहाणेला संघात स्थान मिळेल का? title=

मुंबई : टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताचा आज बांगलादेशशी सामना होतोय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात पराभव पदरी पडलेल्या भारताने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध विजय मिळवत स्पर्धेतील आशा जिवंत असल्याचे दाखवून दिले. 

या दोन सामन्यांपैकी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात फलंदाजीत कोहली, युवराज, धोनीला चांगली कामगिरी करता आली. पहिल्या सामन्यात फिरकीच्या जाळ्यात न्यूझीलंडला अडकवू पाहणाऱा भारतीय संघ स्वत:च त्यात अडकला आणि त्यांचा पराभव झाला. पहिल्याच सामन्यात भारताच्या फलंदाजांनी जी कामगिरी केली ती खरंच निराशाजनक होती. त्यातही सलामीची जोडी पार ढेपाळली. गेल्या दोनही सामन्यात भारताच्या शिखऱ धवन, रोहित शर्मा आणि सुरेश रैना या त्रिकुटाची फलंदाजीत कामगिरी चांगली झालेली नाही. 

मात्र त्यानंतरही धोनीला धवन, रैना संघात हवेच आहेच. धोनीकडे अजिंक्य रहाणेसारखा क्रिकेटपटू असतानाही तो त्याला अजून का खेळवत नाहीये असाच प्रश्न क्रिकेटच्या चाहत्यांना पडलाय. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात शिखर आणि सुरेश रैनाला केवळ एक धाव काढता आली. पहिल्या सामन्यात आलेले अपयश पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात पुसून काढतील अशी अपेक्षा होती. मात्र चाहत्यांची ही अपेक्षाही फोल ठरली. दुसऱ्या सामन्यात शिखर ६ धावांवर बॅक टू पॅव्हेलियन झाला. रैनाने तर हद्दच केली. पहिल्या सामन्यात निदान एक धाव काढू शकणाऱ्या रैनाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात अवघा भोपळाही फोडता आला नाही. 

मात्र तरीही धोनीची त्याच्यावर मर्जी का? असा प्रश्न चाहत्यांकडून विचारला जातोय. रहाणेला १५ मध्ये स्थान असले तरी आतापर्यंतच्या दोन सामन्यात त्याला अंतिम ११ मध्ये सामील करण्यात आलेले नाही. त्याला खेळवण्यामागे धोनीचा काय हेतू असावा हे त्यालाच माहीत. टी-२० वर्ल्डकपपूर्वी धोनीने शिखरची आधीची कामगिरी आणि ऑलराऊंडर रैनामुळे रहाणेला अंतिम ११ मध्ये खेळवणे कठीण असल्याचे म्हटले होते. मात्र धोनीने ज्या दोघांवर इतका विश्वास टाकलाय त्यांची कामगिरी चांगली होतेय कुठे. त्यामुळे भारतासाठी अति महत्त्वाच्या या सामन्यांत धोनी रहाणेला संधी देणार का? की रैना आणि धवनवर पुन्हा एकदा विश्वास दाखवणार हे संध्याकाळीच समजेल.