www.24taas.com, झी मीडिया, लखनऊ
फेसबूक वरील आपली कमेंट आपल्या घरच्यांना अडचणीत आणू शकते हे तुम्हांला वाटत नसेल. पण शाळेच्या माजी विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाबद्दल फेसबूकवर केलेल्या कॉमेंट्मुळे त्याच्या भावालाच शाळेतून काढून टाकण्यात आल्याची धक्कादायक घटना अलीगंजमध्ये घडली आहे.
मोठ्या भावाच्या कृत्याची शिक्षा त्याच्या छोट्या भावाला भोगावी लागली आहे. अलीगंज येथील न्यू वे सीनिअर सेकंडरी हायस्कूलमधून २०१३ साली उत्तीर्ण झालेल्या अनुपम द्विवेदी या विद्यार्थ्याने शाळेच्या प्रशासनाबद्दल फेसबूकवर कमेंट टाकली होती. त्याच्या या कृत्याची शिक्षा त्याच्या भावाला मिळाली. शाळेने अनुपमचा दहावीत शिकणारा भाऊ अनुभव द्विवेदी शाळेतून काढून टाकले.
फेसबूकवर अनुपमने शाळेच्या प्रशासनावर टिप्पणी केली होती. `ही शाळा फक्त हुशार आणि अभ्यासात पुढे असलेल्या मुलांनाच महत्व देते. खेळ, डान्स, म्युझिक अशा इतर कलांमध्ये प्राविण्य मिळवणा-या विद्यार्थ्यांकडे शाळेचे प्रशासन बिलकूल लक्ष देत नाही,` असे अनुपमने आपल्या कमेंटमध्ये म्हटले होते. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना निर्दयीपणे मारहाण केली जात असल्याचा आरोपही त्याने शाळा प्रशासनावर केला होता. अशी कमेंट पोस्ट केल्यानंतर शाळेने अनुपमच्या छोट्या भावालाच शाळेतून काढून टाकले. मात्र अनुपमच्या कमेंटमुळे अनुभवला शाळेतून काढण्यात आल्याचा आरोप शाळेच्या मुख्याध्यापिका रीटा श्रीवास्तव यांनी फेटाळून लावला.
अनुभवने शाळेतील शिक्षकांशी गैरवर्तन केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच याप्रकरणी त्याच्या पालकांना भेटण्यासाठी बोलावण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. अनुभव यानेच आपल्या भावाच्या आयडीवरून शाळेच्या प्रशासनाबद्दल वाईट कमेंट्स केल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. मात्र, अनुपमने आपण फेसबूकवर टाकलेल्या कमेंटमुळेच आपल्या भावाला शाळेतून काढून टाकण्यात आल्याचे म्हटले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.