त्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.

Updated: Oct 11, 2018, 05:43 PM IST
त्याची सेहवागशी तुलना नको, गंभीरचं रोखठोक मत

नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून पृथ्वी शॉनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये पृथ्वी शॉनं शतक झळकावलं. यानंतर लगेचच शॉची तुलना वीरेंद्र सेहवागशी व्हायला लागली. अशी तुलना करणं योग्य नसल्याचं मत सौरव गांगुलीनंतर आता गौतम गंभीरनंही मांडलं आहे. ज्या पद्धतीनं शॉनं आक्रमक शतक केलं ते पाहून कॉमेंट्री करणाऱ्या व्ही.व्ही.एस लक्ष्मणला शॉमध्ये सेहवाग दिसला. तर सुरेश रैनानंही शॉची तुलना सेहवागशी केली.

गौतम गंभीरनं पृथ्वीच्या खेळीची प्रशंसा केली पण सेहवागबरोबर त्याची तुलना करताना दोन वेळा विचार करा, असं गंभीर म्हणाला. पृथ्वीनं नुकतीच त्याचा कारकिर्दीची सुरुवात केली आहे. तर सेहवागनं १०० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. शॉला अजून बराच पल्ला गाठायचा आहे. भविष्यात त्याला अनेक आव्हानांचा सामना करायचा आहे. मी कधीच तुलनेमध्ये विश्वास ठेवत नाही, असं स्पष्ट मत गंभीरनं मांडलं.

पृथ्वी शॉनं १५४ बॉलमध्ये १३४ रनची खेळी केली. या शतकी खेळीमुळे शॉ मोहम्मद अजहरुद्दीन, लाला अमरनाथ, सौरव गांगुली, शिखर धवन, सुरेश रैना आणि सेहवागच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. या सगळ्या खेळाडूंनी पदार्पणाच्या टेस्टमध्ये शतक केलं होतं.

सहवाग जिनियस, तुलना नको- गांगुली

शॉनं पहिल्या टेस्टमध्ये शानदार प्रदर्शन केलं असलं तरी त्याची तुलना सेहवागशी करु नका, असं गांगुली म्हणाला. शॉला जगभरात रन करण्यासाठी वेळ दिला पाहिजे. शॉ ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतही रन करेल, असा मला विश्वास आहे. पण सेहवाग जिनियस खेळाडू होता, त्यामुळे शॉची सेहवागबरोबर तुलना करु नका, असं वक्तव्य गांगुलीनं केलं.