close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो

आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. 

Updated: Aug 27, 2018, 07:34 PM IST
आशियाई स्पर्धा : नीरज चोप्राच्या भाल्याचा सुवर्ण थ्रो

जकार्ता : आशियाई स्पर्धा २०१८ मध्ये भारताच्या नीरज चोप्राला भालाफेकमध्ये सुवर्ण पदक मिळालं आहे. ८८.०६ च्या थ्रोमुळे नीरज चोप्रानं सुवर्ण पदक जिंकलं. आशियाई स्पर्धेत भालाफेकमध्ये सुवर्ण पदक पटकावणारा नीरज पहिला भारतीय आहे. २० वर्षांचा नीरज चोप्रा आशियाई स्पर्धेच्या ओपनिंग सेरेमनीमध्ये भारताचा फ्लॅग बेयरर होता.

८३.४६ च्या थ्रोनं सुरुवात

नीरज चोप्रा सुरुवातीपासूनच सुवर्ण पदकाचा दावेदार होता. त्यानं सुरुवातही चॅम्पियन असल्यासारखीच केली. नीरजनं पहिला थ्रो ८३.४६ मीटरचा केला. पण त्याचा दुसरा थ्रो फाऊल झाला. नीरजनं तिसऱ्या थ्रोमध्ये मात्र याची भरपाई केली आणि ८८.०६ चा थ्रो करून सुवर्ण पदक निश्चित केलं. नीरजनं चौथा थ्रो ८३.२५ आणि पाचवा थ्रो ८६.३६ मीटरचा केला.

चीनला रौप्य पाकिस्तानला कांस्य

भालाफेकमध्ये चीनच्या लियू क्विझेनला रौप्य पदक मिळालं. त्यानं ८२.२२ मीटर लांब भाला फेकला. पाकिस्तानच्या अरशद नदीमला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. अरशदनं ८०.७५ मीटर लांब भाला फेकला. या स्पर्धेतलं पाकिस्तानचं हे तिसरं मेडल आहे. याआधी पाकिस्तानच्या २ खेळाडूंना रौप्य पदक मिळालं आहे.

कॉमनवेल्थमध्येही नीरजला सुवर्ण पदक

नीरज चोप्राला एप्रिलमध्ये झालेल्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ स्पर्धेतही सुवर्ण पदक मिळालं होतं. कॉमनवेल्थमध्ये नीरजनं ८६.४७ मीटर लांब भाला फेकला होता. याआधी २०१६ साली पोलंड अंडर-२० वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये नीरजनं ८६.४८ मीटरचा थ्रो करून वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकली होती. नीरज चोप्रा आशियाई चॅम्पियनशीपही जिंकला आहे.

८ सुवर्ण पदकांसह भारताला ४१ पदकं

२० वर्षांच्या नीरज चोप्रानं भारताला ८वं सुवर्ण पदक जिंकवून दिलं. या स्पर्धेमध्ये आता भारताकडे एकूण ४१ पदकं आहेत. यामध्ये १३ रौप्य आणि २० कांस्य पदकांचा समावेश आहे. एथलिटिक्समध्ये भारतानं आत्तापर्यंत ८ पदकं जिंकली आहे. यामध्ये २ सुवर्ण पदकं आहेत. कालच तेजिंदर पाल सिंग तूरनं शॉट पुटमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. 

दरम्यान मी हे सुवर्ण पदक भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया नीरज चोप्रानं या विजयानंतर दिली आहे. १६ ऑगस्टला अटल बिहारी वाजपेयी यांचं दिर्घ आजारानं निधन झालं.