रोहित शर्माला कर्णधार करण्याबाबत बीसीसीआयचा विचार सुरु?

बीसीसीआय करतेय भारतीय संघाचा कर्णधार बदलण्याचा विचार

Updated: Jul 15, 2019, 02:44 PM IST
रोहित शर्माला कर्णधार करण्याबाबत बीसीसीआयचा विचार सुरु? title=

मुंबई : आयसीसी क्रिकेट वर्ल्डकप २०१९ मध्ये भारतीय टीमचा सेमीफायनलमध्ये दारुण पराभव झाला. या पराभवानंतर बीसीसीआय अॅक्शन मूडमध्ये दिसत आहे. बीसीसीआय भारतीय संघाचा कर्णधार बदलण्याचा विचार करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्ल्डकपमध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला वनडे आणि टी-20 चा कर्णधार बनवलं जावू शकतं. तर विराट कोहलीकडे टेस्ट टीमचं कर्णधारपद कायम ठेवलं जावू शकतं.

भारतीय क्रिकेटमध्ये देखील काही बदल होण्याची शक्यता आहे. असं झालं तर हा विराट कोहलीसाठी मोठा झटका असेल. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयएएनएसला माहिती दिली की, 'टीमला आणखी मजबूत करण्यासाठी संघात काही बदल केले जावू शकतात.'

अधिकाऱ्याने म्हटलं की, 'रोहित शर्माकडे वनडेचं कर्णधारपद देण्याची हिच योग्य वेळ आहे. यासाठी मानसिकरित्याही तो तयार आहे. यासाठी सध्याचा कर्णधार आणि टीम मॅनेजमेंटने देखील त्याचं समर्थन केलं पाहिजे. विराट आणि रोहित मध्ये कोणताच वाद नसल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं'

अधिकाऱ्यांने पुढे म्हटलं की, 'आता वेळ जुन्या गोष्टीवर पुन्हा बोलण्याची नाही आहे. पुढच्या गोष्टींसाठी तयारी केली पाहिजे. आता पुढच्या वर्ल्डकपच्या तयारीला लागलं पाहिजे. टीमला तयार करण्यासाठी विचार केला पाहिजे. काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. रोहित यासाठी एक चांगला पर्याय आहे.'

अधिकाऱ्याने म्हटलं की, बीसीसीआयमध्ये सुप्रीम कोर्टाकडून नियुक्त COA चे प्रमुख विनोद राय यांनी देखील लवकरच एक बैठक घेणार असल्याचं म्हटलं आहे. यामध्ये कोच रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि चीफ सिलेक्टर एमएसके प्रसाद देखील उपस्थित राहतील.

भारतीय संघ आता वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणार आहे. ३ ऑगस्टपासून हा दौरा सुरु होणार आहे. भारत - वेस्टइंडीजमध्ये तीन वनडे, तीन टी-20 आणि 2 टेस्ट सामने खेळले जाणार आहेत.

आधी टी-20 त्यानंतर वनडे सीरीज आणि मग टेस्ट सीरीज खेळली जाणार आहे. विराट कोहलीला टी-20 आणि वनडे सीरीजसाठी आराम दिला जावू शकतो. तर जसप्रीत बुमराहला देखील या सिरीजसाठी आराम दिला जावू शकतो.