Corona : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हा क्रिकेटपटू करणार वर्ल्ड कपच्या जर्सीचा लिलाव

कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे.

Updated: Apr 1, 2020, 07:23 PM IST
Corona : कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हा क्रिकेटपटू करणार वर्ल्ड कपच्या जर्सीचा लिलाव

लंडन : कोरोना व्हायरसच्या संसर्गाने जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी जगातल्या बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाशी सामना करण्यासाठी अनेक क्रिकेटपटूंनी आर्थिक मदत केली आहे. इंग्लंडचा विकेट कीपर जॉस बटलर लंडनमधल्या २ रुग्णालयांना आर्थिक मदत देणार आहे. २०१९ वर्ल्ड कपच्या फायनलसाठी वापरलेल्या जर्सीचा बटलर लिलाव करणार आहे. या लिलावातून मिळणारे पैसे बटलर या २ रुग्णालयांना देणार आहे. 

२०१९ साली जुलै महिन्यात झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंडवर विजय मिळवला होता. कोरोनाग्रस्तांची मदत करण्यासाठी बटलरने ट्विटरवर एक व्हिडिओ शेयर केला आहे. रॉयल ब्रॉम्पटन आणि हेयरफील्ड या रुग्णालयांना मदत करणार असल्याचं बटलरने ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

इंग्लंडमधली सध्याची परिस्थिती बघता मेरिलबोन क्रिकेट क्लब (एमसीसी)ने आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांना लॉर्ड्स मैदानाची पार्किंग आणि स्टोरेजची जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. वेलिंग्टन हॉस्पिटल, युनिव्हर्सिटी कॉलेज हॉस्पिटल, सेंट जॉन आणि सेंट एलिजाबेथ हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना ही जागा उपलब्ध करुन देत असल्याचं एमसीसीने सांगितलं आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे १५०० जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ हजारांपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 

दुसरीकडे भारतात कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी बीसीसीआयने पीएम केयर्स फंडाला ५१ कोटी रुपयांची मदत केली आहे. तर रोहितने पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी ४५ लाख रुपये, महाराष्ट्र मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी २५ लाख रुपये, फीडिंग इंडियासाठी ५ लाख रुपये, स्ट्रे डॉग्ससाठी ५ लाख रुपये दिले आहेत.

याआधी सचिन तेंडुलकरने ५० लाख रुपये, सुरेश रैनाने ५२ लाख रुपये, सौरव गांगुलीने ५० लाख रुपयांचे तांदूळ, अजिंक्य रहाणेने १० लाख रुपयांची मदत केली होती.