ICC ODI World Cup 2023: भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका (IND - NZ ODI Series) सुरु आहे. याआधी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वात टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेविरुद्धची मालिका 3-0 (IND vs SL) अशी निर्विवाद जिंकली होती. आता रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणाऱ्या टीम इंडियाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात चुरशीच्या लढतीत न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला. भारत आणि न्युझीलंडदरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना 21 जानेवारीला खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वी रोहित शर्माच्या कर्णधारपादबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे.
वर्ल्ड कपपर्यंत राहणार कर्णधारपदी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा आगामी आयसीसी वन डे वर्ल्ड कप 2023 (ICC ODI World Cup 2023) पर्यंतच टीम इंडियाच्या कर्णधारपदीच राहण्याची शक्यता आहे. या वर्षाच्या शेवटी वन डे वर्ल्ड कप स्पर्धा होणार असून भारत या स्पर्धेचं आयोजन करणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माकडेच असेल. पण स्पर्धेबरोबरच रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा कार्यकाळही संपेल. दुसरीकडे एकदिवसीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुढच्या वर्षी होणाऱ्या टी20 वर्ल्ड कप स्पर्धेत (T20 World Cup 2024) टीम इंडियाचं कर्णधारपद सांभाळेल.
हार्दिकवर टीम इंडियाची जबाबदारी
बीसीसीआयच्या (BCCI) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शर्मा वन डे वर्ल्ड कप पर्यंतच कर्णधारपद सांभाळेल. पण कसोटी संघाच्या (Test Team) कर्णधारपदी रोहित कायम राहिल. सध्या कसोटी संघाच्या कर्णधारपदासाठी के एल राहुलच्या (K L Rahul) नावाची जोरदार चर्चा आहे. दरम्यान एकदिवसीय संघाचा कर्णधार कोण असणार याचाही अंदाज बांधला जात आहे.
2023 वन वर्ल्ड कपनंतर रोहित शर्माने एकदिवसीय संघाचं कर्णधारपद सोडलं तर नवा कर्णधार कोण असेल याचा पर्याय बीसीसीआय शोधतंय. सध्यातरी या स्पर्धेत हार्दिक पांड्या अव्वल स्थानावर आहे. हार्दिक पांड्याने कर्णधार म्हणून आपली योग्यता सिद्ध केली आहे, रोहितनंतर हार्दिकशिवाय सध्यातरी टीमकडे दुसरा पर्याय नाही.