Team India Tour of Sri Lanka : श्रीलंकाविरुद्ध होणाऱ्या टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची (Team India) घोषणा होण्याआधी एक मोठी घडामोड घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानंतर (Rohit Sharma) आता विराट कोहलीची (Virat Kohli) सुट्टीही रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे रोहित आणि विराट श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध असतील. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गौतम गंभीरने (Gautam Gambhir) रोहित आणि विराटला एकदिवसीय मालिकेसाठी उपलब्ध राहाण्याचे आदेश दिले होते. गंभीरच्या या आदेशासमोर रोहित आणि विराटला झुकावं लागलं आहे.
रोहित-विराटची सुट्टी रद्द
टी20 वर्ल्ड कप स्पर्धेनंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली होती. रोहित शर्मा अमेरिका तर विराट कोहली लंडनमध्ये सु्ट्टी एंजॉय करतायत. टी20 वर्ल्ड कप विजयानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे दोघंही श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत खेळताना दिसण्याची शक्यता आहे. गौतम गंभीरने प्रशिक्षकपदाची सूत्र हाती घेताच कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे.
7 वर्षानंतर श्रीलंकेत एकदिवसीय मालिका
विराट कोहली गेल्या सात वर्षांपासून श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळलेला नाही. विराट श्रीलंकेत शेवटची एकदिवसीय मालिका 2017 मध्ये खेळला होता. 2017 मध्ये झालेल्या या मालिकेत विराट कोहलीने 110 च्या अॅव्हरेजने 330 धावा केल्या होत्या. यात दोन शतकं आणि एका अर्धशतकाचा समावेश होता. विराट कोहलीच्या स्ट्राईक रेट 111.86 इतका होता. आता सात वर्षांनी पुन्हा एकदा श्रीलंकेत धावा करण्यासाठी विराट कोहली सज्ज झालाय.
सूर्यकुमार यादव कर्णधार
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर टी20 कर्णधारपदाबाबतही मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवला टी20 संघाच्या कर्णधारपदी नियुक्त केलं जाण्याची शक्यता आहे. टी20 च्या कर्णधारपदावरुन बीसीसीआयचे सचिव जय शाह आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यात मतभेद अकल्याचंही समोर आलं आहे. जय शाह हार्दिक पांड्याला कर्णधार करण्यासाठी आग्रही आहेत. तर गंभीरची पसंती सूर्यकुमारला आहे.
भारताचा श्रीलंका दौरा (IND vs Sri Lanka Revised Schedule)
27 जुलै – पहिला टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
28 जुलै – दुसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
30 जुलै – तिसरा टी-ट्वेंटी सामना, पल्लेकेले
2 ऑगस्ट – पहिली वनडे, कोलंबो
4 ऑगस्ट – दुसरी वनडे, कोलंबो
7 ऑगस्ट – तिसरी वनडे, कोलंबो
भारतीयी वेळेनुसार कधी सामने
भारत आणि श्रीलंकादरम्यानचे टी20 सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे. तर एकदिवसीय सामन्यांची सुरुवात भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता होणार आहे.