नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे सीरिज संपल्यानंतर आता आयपीएलला सुरुवात होणार आहे. २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होईल. आयपीएल संपल्यानंतर लगेचच वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. ३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरु होईल. आयपीएल आणि लगेचच वर्ल्ड कप यामुळे भारतीय खेळाडूंच्या शारिरिक तणावाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून उपस्थित होत आहे. तसंच आयपीएलदरम्यान काही मॅचमध्ये वर्ल्ड कप खेळणाऱ्या महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात यावी, अशीही मागणी सुरु झाली आहे. या सगळ्या प्रश्नांवर भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीने उत्तर दिलं आहे. आयपीएलमध्ये किती मॅच खेळाव्या हे खेळाडूंनी ठरवावं असं विराट म्हणाला आहे.
'खेळाडूंवर येणाऱ्या शारिरिक तणावाबद्दल आयपीएलच्या फ्रॅन्चायजीसोबत चर्चा झाली आहे,' असं भारतीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद आधीच म्हणाले आहेत. पण आता कोहलीने ही सगळी जबाबदारी खेळाडूंवर टाकली आहे.
'आम्ही खेळाडूंना स्वत:चा निर्णय स्वत: घेऊन याबाबत फ्रॅन्चायजींना सूचना देण्याची जबाबदारी दिली आहे. आमचे फिजियो पॅट्रिक फरहार्ट हे आयपीएलदरम्यान खेळाडूंच्या संपर्कात असतील. आम्ही एक ठराविक वेळ सांगू, या वेळेमध्ये खेळाडू विश्रांती करू शकतील. त्यांना या संधीचा आरामासाठी फायदा करुन घेता येईल. वर्ल्ड कपसाठी सगळ्या गोष्टींवर लक्ष दिलं जाईल,' असं वक्तव्य कोहलीने केलं.
'वर्ल्ड कप हा चार वर्षातून एकदा येतो पण आयपीएल प्रत्येकवर्षी असतं, पण आम्ही आयपीएल खेळण्यासाठी प्रतिबद्ध नाही, असा त्याचा अर्थ होत नाही. प्रत्येकाला चतुर बनावं लागेल. याची जबाबदारी खेळाडूची असेल. कोणालाही निर्णय घ्यायला मजबूर केलं जाणार नाही', असं कोहलीने स्पष्ट केलं.
'भारतीय टीमसाठी हे सत्र खूप व्यस्त होतं, पण टीममध्ये आत्मविश्वास आहे. खेळाडूंना आता आयपीएलची मजा घेण्याचा हक्क आहे', असं कोहलीला वाटतं.
'खूप कालावधी क्रिकेट खेळण्याचा प्रभाव पडतो. पण हा कारणं शोधण्याचा प्रकार नाही. टीम म्हणून तुम्ही जेव्हा खेळता तेव्हा प्रत्येकाची जिंकण्याचीच इच्छा असते. आम्ही ज्या प्रकारचं क्रिकेट खेळलो त्यामुळे खुश आहोत. खेळाडूंनी त्यांची क्षमता दाखवली,' असं विराटने सांगितलं.