या खेळाडूंना बाहेर ठेवा, दादाचा विराटला सल्ला

भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. 

Updated: Jul 30, 2018, 05:06 PM IST
या खेळाडूंना बाहेर ठेवा, दादाचा विराटला सल्ला  title=

मुंबई : भारत आणि इंग्लंडमधल्या ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पण या मॅचमध्ये कोणत्या खेळाडूंना संधी द्यायची याचा निर्णय घेताना विराट कोहली आणि रवी शास्त्री यांची डोकेदुखी वाढणार आहे. पण भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं विराट आणि रवी शास्त्रीला मोलाचा सल्ला दिला आहे. भारतानं ओपनिंगला मुरली विजय आणि लोकेश राहुल यांना संधी द्यावी असं गांगुली म्हणाला.

पहिल्या टेस्टमध्ये शिखर धवनला टीममध्ये घेणं योग्य होणार नाही. धवन वनडेमधला चांगला खेळाडू आहे पण टेस्टमधलं त्याचं रेकॉर्ड चांगलं नाही. शिखर धवननं दक्षिण आफ्रिका दौऱ्यातल्या एका टेस्ट मॅचच्या दोन इनिंगमध्ये फक्त ३२ रन केल्या होत्या. इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यामध्येही त्याची कामगिरी चांगली नव्हती. दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये धवनची सरासरी २२.०६ आहे तर इंग्लंडमध्ये हीच सरासरी २०.३३ एवढीच आहे, असं गांगुली म्हणाला.

मुरली विजयचं इंग्लंडमधलं रेकॉर्ड चांगलं आहे. भारताच्या मागच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये विजय भारताचा सर्वाधिक रन करणारा खेळाडू होता. या दौऱ्याच्या पहिल्या टेस्टमध्ये विजयनं १४६ रनची खेळी केली होती.

शिखर धवनबरोबरच चेतेश्वर पुजाराचंही इंग्लंडमधलं रेकॉर्ड फारसं चांगलं नाही. काऊंटीमध्ये पुजारा यॉर्कशायरकडून खेळला पण यावेळी त्याला यश आलं नाही. एसेक्सविरुद्धच्या सराव सामन्यात पुजारानं १ आणि २३ रन केले. त्यामुळे पुजाराला पहिल्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळणार नाही, असं गांगुलीला वाटतंय. पण धवन आणि पुजाराची तुलना केली तर पुजारा चांगला बॅट्समन आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये पुजारानं अर्धशतक केलं होतं. दक्षिण आफ्रिकेमध्ये पुजाराच्या नावावर एक शतकही आहे, हे गांगुलीनं सांगितलं.