टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकची पाठदुखी वाढली

जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.

Updated: Oct 1, 2019, 10:23 PM IST
टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकची पाठदुखी वाढली title=

मुंबई : जसप्रीत बुमराहच्या दुखापतीनंतर टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे. ऑलराऊंडर हार्दिक पांड्याची पाठदुखी पुन्हा वाढली आहे. या दुखापतीमुळे हार्दिक पांड्याला बराच कालावधी क्रिकेटच्या मैदानापासून लांब राहावं लागू शकतं. पाठदुखीवर उपचार घेण्यासाठी हार्दिक पांड्या बुधवारी इंग्लंडला रवाना होणार आहे. पाठीच्या दुखापतीसाठी हार्दिक तिसऱ्यांदा इंग्लंडला जात आहे.

मागच्या काही दिवसांमध्ये दुखापतीमुळे टीम इंडिया बाहेर गेलेला हार्दिक पांड्या हा दुसरा खेळाडू आहे. याआधी जसप्रीत बुमराह कंबरेला फ्रॅक्चर झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमधून बुमराहला माघार घ्यावी लागली होती.

२५ वर्षांचा हार्दिक पांड्या मागच्या वर्षापासून पाठदुखीमुळे त्रस्त आहे. मागच्या वर्षी आशिया कपमध्ये हार्दिकला पाठदुखीमुळे मॅच अर्ध्यात सोडावी लागली होती. शस्त्रक्रियेची गरज आहे का औषधांवर दुखापत बरी होईल, याबाबत हार्दिक इंग्लंडच्या डॉक्टरांशी चर्चा करणार आहे, असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.

हार्दिक पांड्याने वर्ल्ड कपनंतर फिट राहण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. यासाठी तो वेस्ट इंडिज दौऱ्यावरही गेला नाही. यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये खेळताना पांड्याच्या पाठदुखीने पुन्हा डोकं वर काढलं. त्यामुळे त्याने दुखापतीवर उपचार करण्याचा निर्णय घेतला.

हार्दिक पांड्याने ११ टेस्ट मॅचमध्ये १७ विकेट घेतल्या आहेत, याचसोबत ५३२ रनही केल्या आहेत. ५४ वनडेमध्ये त्याने ९३७ रन करून ५४ विकेट घेतल्या आहेत. तर ४० टी-२० आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये पांड्याला ३१० रन करण्यात आणि ३८ विकेट घेण्यात यश आलं आहे.