स्पिनरऐवजी फास्ट बॉलर खेळवण्याचा डाव भारतावरच उलटला

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे.

Updated: Dec 16, 2018, 06:31 PM IST
स्पिनरऐवजी फास्ट बॉलर खेळवण्याचा डाव भारतावरच उलटला title=

पर्थ : भारताविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीमध्ये पोहोचला आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोअर १३२/४ एवढा झाला आहे. पहिल्या इनिंगमध्ये मिळालेल्या ४३ रनच्या आघाडीमुळे आता ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी १७५ रन एवढी झाली आहे. दिवसाअखेरीस उस्मान ख्वाजा ४१ रनवर तर टीम पेन ८ रनवर नाबाद खेळत आहेत. भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक २ विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमराहला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाचा ओपनर एरॉन फिंच रिटायर्ड हर्ट झाला आहे.

विराटची रणनिती अंगाशी आली?

या टेस्टमध्ये ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत पोहोचल्यामुळे विराट कोहलीची रणनिती भारताच्या अंगाशी आली आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय. पर्थच्या मैदानावरचं गवत बघून विराटनं चारही फास्ट बॉलर घेऊन मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. पण ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादव या ४ फास्ट बॉलरना खेळवूनही हिरव्यागार खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियानं पहिल्या इनिंगमध्ये ३२६ रन करता आल्या.

पहिल्या इनिंगमध्ये भारताकडून ईशांत शर्माला सर्वाधिक ४ विकेट मिळाल्या. तर जसप्रीत बुमराह, उमेश यादवला प्रत्येकी दोन-दोन विकेट घेण्यात यश आलं. ऑलराऊंडर असलेल्या हनुमा विहारीनं त्याच्या ऑफ स्पिननं २ बळी घेतले.

नॅथन लायनच्या ५ विकेट

एकीकडे भारतानं सगळे फास्ट बॉलर घेऊन खेळण्याचा निर्णय घेतला असतनाचा ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथन लायननं भारताच्या ५ विकेट घेतल्या. तर फास्ट बॉलर असलेल्या मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूडला प्रत्येकी २-२ आणि पॅट कमिन्सला विराट कोहलीची महत्त्वाची विकेट मिळाली.

एकीकडे ऑस्ट्रेलियाच्या ऑफ स्पिनरला ५ विकेट मिळत असताना भारतानं एकही स्पिनर न खेळवता सगळे फास्ट बॉलर खेळवण्याची रणनिती कितपत योग्य होती, असा सवाल आता उपस्थित होतोय. या टेस्ट मॅचआधीच भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे अश्विनऐवजी डावखुरा स्पिनर रवींद्र जडेजाचा पहिल्या १३ खेळाडूंमध्ये समावेश करण्यात आला होता. पण भारतीय टीमनं जडेजाऐवजी हनुमा विहारीवर विश्वास दाखवला.

खेळपट्टीवर असलेल्या गवतामुळे आपण खुश असल्याचं विराटनं या मॅचआधी एका वेबसाईटशी बोलताना सांगितलं. गवत असल्यामुळे ही खेळपट्टी भारताच्या फास्ट बॉलरना आणखी मदत करेल. खेळपट्टीवरचं गवत बघून आम्ही घाबरलो नाही, तर रोमांचित झालो. या टेस्टमध्ये आणखी सकारात्मक मानसिकता घेऊन मैदानात उतरू असं विराट म्हणाला होता. तसंच पिच क्युरेटर खेळपट्टीवरचं गवत काढणार नाही, अशी अपेक्षाही विराटनं व्यक्त केली होती.