Jay Shah on BCCI Contract List Controversy : इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेनंतर बीसीसीआयने वार्षिक करार यादी (BCCI Contract List) जाहीर केली होती. त्यावेळी बीसीसीआयने मोठं पाऊल उचलून श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि इशान किशन (Ishan Kishan) यांना करारातून बाहेरचा रस्ता दाखवला. बीसीसीआयने वारंवार इशारा देऊन सुद्धा श्रेयस आणि इशान यांनी डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खेळण्यात रस दाखवला नाही. त्यानंतर बीसीसीआयने दोन्ही खेळाडूंना करारबाह्य केलं होतं. अशातच आता कुणामुळे या दोघांना बाहेर ठेवण्यात आलं यावर बीसीसीआय सचिव जय शहा (Jay Shah) यांनी मोठा खुलासा केला आहे. अजित आगरकर यांनी दोघांना करारातून वगळण्याचा निर्णय घेतला होता, असा खुलासा जय शहा यांनी केला आहे.
जय शहा काय म्हणाले?
तुम्ही संविधान पाहू शकता. मी फक्त सिलेक्शन कमिटीची बैठक बोलवतो. जो निर्णय अजित आगरकर यांचा होता. जेव्हा या दोन्ही खेळाडूंनी देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी नकार दिला तेव्हा अजित आगरकर यांनी हा निर्णय घेतला होता. माझं काम फक्त अंमलबजावणी करण्याचं असलं. मला जसं सांगितलं जातं तसं मी काम करतो. तुम्ही पाहू शकता की, आपल्याला संजू सॅमसन सारखा वेगळा खेळाडू मिळाला आहे, असं जय शहा म्हणाले.
मी दोन्ही खेळाडूंसह बोललो देखील आहे. मी त्यांची बोललोय, यावर मीडिया रिपोर्ट देखील आला होता. हार्दिक पांड्याने सांगितलं होतं की, जर बीसीसीआय व्हाईट बॉल क्रिकेटसाठी निवड करत असेल तर तो विजय हजारे ट्रॉफी आणि सैय्यद मुस्ताक अली ट्रॉफी खेळण्यासाठी तयार असेल. त्यामुळे प्रत्येक खेळाडूला खेळावंच लागेल. त्याची मर्जी असेल किंवा नसेल तरी देखील..., असंही जय शहा यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, जय शहा यांनी इशानसोबत झालेल्या संभाषणावर देखील खुलासा केला. गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर इशानसोबत नेमकं काय बोलणं झालं होतं? असा सवाल विचारला गेला. त्यावर, मी त्याला कोणताही सल्ला दिला नाही. आमच्यात मैत्रीपूर्ण बोलणं झालं की त्याला आता चांगलं खेळलं पाहिजे. मी त्यालाच नाही तर अनेक खेळाडूंसोबत असंच बोलतो, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.
वार्षिक करार म्हणजे काय?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंशी दरवर्षी 12 महिन्यांचा करार केला जातो. या कराराअंतर्गत खेळाडूंना एक ठराविक रक्कम मिळते. हे खेळाडू वर्षभरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले नाहीत तरी या खेळाडूंना ती रक्कम मिळते. बीसीसीआयने यासाठी 4 ग्रेड केले आहेत. A+, A, B, आणि C. A+ ग्रेडमधल्या खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. A ग्रेडमधल्या खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये दिले जातात. B ग्रेडमधल्या खेळाडूंना 3 कोटी रुपये तर C ग्रेडमधील खेळाडूंना प्रत्येक वर्षी 1 कोटी रुपये बीसीसीआयकडून दिले जातात.