दुबई : आयसीसीनं नव्या टेस्ट क्रमवारीची घोषणा केली आहे. बॅट्समनच्या क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर चेतेश्वर पुजारा टॉप-५ बॅट्समनमध्ये आला आहे. जसप्रीत बुमराहनं बॉलरच्या क्रमवारीत सर्वोत्तम स्थान गाठलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये पुजारानं १२३ रन आणि ७१ रनची खेळी केली. यामुळे पुजारानं क्रमवारीत जो रूट आणि डेव्हिड वॉर्नरला मागे टाकत चौथा क्रमांक पटकावला आहे. बॅट्समनच्या यादीत स्टिव्ह स्मिथ तिसऱ्या क्रमांकावर आणि जो रूट पाचव्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असला तरी न्यूझीलंडचा केन विलियमसन कोहलीच्या जवळ पोहोचला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये विलियमसननं ८९ आणि १३९ रनची खेळी केली. यामुळे केन विलियमसनच्या खात्यात आता ९१३ रेटिंग अंक आहेत. ९०० पेक्षा जास्त रेटिंग अंक मिळवणारा विलियमसन हा न्यूझीलंडचा पहिला आणि जगातला ३२वा खेळाडू बनला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विराटला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या मॅचमध्ये विराटनं ३ आणि ३४ रन केले. यामुळे विराटचं १५ अंकांचं नुकसान झालं. आता विराट कोहलीकडे ९२० अंक आहेत. विराट आणि विलियमसनमध्ये आता फक्त ७ अंकांचा फरक आहे. पर्थमध्ये विराटनं मोठी धावसंख्या उभारली नाही तर मात्र विराटला त्याचं पहिलं स्थान गमवावं लागू शकतं.
ऍडलेड टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या अजिंक्य रहाणेच्या क्रमवारीमध्येही सुधार झाला आहे. बॅट्समनच्या यादीत रहाणे १९व्या क्रमांकावरून १७व्या क्रमांकावर पोहोचला आहे. केएल राहुल २६व्या, मुरली विजय ४५व्या आणि रोहित शर्मा ५३व्या स्थानवर घसरले आहेत.
बॉलरच्या यादीमध्ये भारताचा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह त्याचं सर्वोत्कृष्ट स्थान ३३व्या क्रमांकावर गेला आहे. बुमराहनं पहिल्या टेस्टमध्ये ६ विकेट घेतल्या. त्यामुळे बुमराहला ५ क्रमांकानी वर आला. तर स्पिनर आर.अश्विन सहाव्या क्रमांकावर गेला आहे. मोहम्मद शमी २३व्या आणि ईशांत शर्मा २७व्या क्रमांकावर कायम आहेत. देशांच्या यादीमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.