साऊथम्पटन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत सध्या कठीण स्थितीमध्ये आहे. २४५ रनचा पाठलाग करताना भारतानं सुरुवातीलीच ३ विकेट गमावल्या आहेत. चौथ्या दिवसाच्या लंचपर्यंत भारताचा स्कोअर ४६-३ एवढा आहे. कर्णधार विराट कोहील (१०) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (१३) रनवर खेळत आहे. भारताला अजूनही १९९ रनची आवश्यकता आहे. इंग्लंडनं ठेवलेल्या या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा ओपनर लोकेश राहुल शून्य रनवर आऊट झाला. तर शिखर धवन १७ रनवर आणि पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा ५ रनवर आऊट झाला.
चौथ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडला फक्त ११ रन करता आल्या. भारताला पहिल्या इनिंगमध्ये २७ रनची आघाडी मिळाली होती. मोहम्मद शमीनं दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्का दिला आणि ब्रॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर सॅम कुरन रन आऊट झाला.
भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला २ विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॉस बटलरनं सर्वाधिक ६९ रन केले तर जो रूटनं ४८ आणि सॅम कुरननं आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन महत्त्वपूर्ण ४६ रन केले.
५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्या होत्या. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन करत भारतानं ही टेस्ट जिंकली होती. त्यामुळे भारत सीरिजमध्ये १-२नं पिछाडीवर आहे. सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे.