हिटमॅनचं शतक म्हणजे टीम इंडियाचा विजय निश्चित, विराटसेना चौथी कसोटी जिंकणार?

 इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडिया (India vs England 4th Test) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शतकी खेळीच्या जोरावर मजबूत स्थितीत पोहचली आहे.   

Updated: Sep 5, 2021, 04:35 PM IST
हिटमॅनचं शतक म्हणजे टीम इंडियाचा विजय निश्चित, विराटसेना चौथी कसोटी जिंकणार?

लंडन : इंग्लंड विरुद्धच्या चौथ्या कसोटीत टीम इंडिया (India vs England 4th Test) रोहित शर्माच्या (Rohit Sharma) शतकी खेळीच्या जोरावर मजबूत स्थितीत पोहचली आहे. चौथ्या कसोटीतील तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियाने 3 विकेट्स गमावून 270 धावा केल्या आहेत. टीम इंडियाकडे 171 धावांची आघाडी आहे. तर 7 विकेट्स हातात आहेत. रोहित शर्माने दुसऱ्या डावात 127 धावांची धमाकेदार शतकी खेळी केली. तसेच चेतेश्वर पुजारानेही 61 धावा केल्या. या कसोटीतील 2 दिवसांचा खेळ बाकी आहे. टीम इंडिया ही मॅच जिंकेल, असं आम्ही नाही तर रोहित शर्माची आकडेवारी म्हणतेय. कसोटीत रोहितने आतापर्यंत 7 वेळा शतक लगावलं. तेव्हा तेव्हा टीम इंडियाचा विजय झाला. इंग्लंड विरुद्धचं हे शतक रोहितच्या कसोटी कारकिर्दीतील 8 वं शतक ठरलं. त्यामुळे रोहितंच शतक हे भारताच्या विजयाचे शुभसंकेतच आहेत, असंच म्हटलं जातंय. (india vs england 4th test day 4 team india never loss test match after  Rohit Sharma scored hundred)

रोहितने 2013 मध्ये कोलकातामध्ये वेस्टइंडिज विरुद्ध कसोटी पदार्पण केलं होतं. रोहितने आपल्या डेब्यूमध्ये 177 धावांची खेळी केली. हा सामना भारताने एक डाव आणि 51 धावाने जिंकला होता. यानंतर याचवर्षी रोहितने आपल्या होमग्राउंड अर्थात मुंबईत नॉटआऊट 111 धावा केल्या. हा सामनादेखील भारताने डाव आणि 126 धावांनी जिंकला. रोहित आपल्या पहिल्याच कसोटी मालिकेत 'मॅन ऑफ द सीरिज' ठरला होता.

त्यानंतर रोहितला कसोटीतील तिसऱ्या शतकासाठी 4 वर्षांची वाट पाहावी लागवली. रोहितने हे तिसरं शतक जन्मभूमी नागपुरात 2017 मध्ये श्रीलंका विरुद्ध झळकावलं होतं. तेव्हा रोहितने नाबाद 102 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाने डाव आणि 239 धावांच्या मोठ्या फरकाने श्रीलंकेवर मात केली होती.  

2019 मध्ये पहिल्यांदाच सलामीला 

रोहित शर्माला 2019 मध्ये पहिल्यांदाच कसोटीमध्ये ओपनिंग करण्याची संधी मिळाली. रोहितने आफ्रिकेविरुद्ध सलामीला खेळण्याची सुरुवात केली. विशाथापट्टणममध्ये या सामन्याचे आयोजन केलं गेलं होतं. रोहितने या सामन्यात धमाकाच केला. रोहितने पहिल्या आणि दुसऱ्या डावात शतक ठोकलं. पहिल्या डावात 176 तर दुसऱ्या डावात 127 धावा चोपल्या. टीम इंडियाने हा सामना 203 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला.  

याच मालिकेतील तिसरा सामना रांचीत खेळवला गेला. इथे रोहितने आफ्रिकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. रोहितने या सामन्यात द्विशतकी खेळी केली. रोहितने 212 धावांची द्विशतक केलं. भारताने या सामन्यात आफ्रिकेचा डाव आणि 202 धावांनी पराभव केला होता. रोहित पुन्हा मालिकावीर ठरला होता. 

2021 मध्ये 7 वं आणि 8 वं शतक

रोहितने कारकिर्दीतील 7 वं शतक हे या वर्षी चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्धच लगावलेलं. रोहितने 161 धावा केल्या. भारताने या सामन्यात इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केलं. एकूणच जेव्हा जेव्हा रोहितने शतक ठोकलं तेव्हा तेव्हा भारत विजयी झालाय. त्यामुळे टीम इंडिया इंग्लंड विरुद्ध सुरु असलेल्या चौथ्या कसोटी सामन्याचा निकाल काय लागतो, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.