साऊथम्टन : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारताचा संघर्ष सुरुच आहे. चौथ्या दिवसाच्या चहापानाआधी विराट कोहली अर्धशतक करून आऊट झाला. चहापानावेळी भारताचा स्कोअर १२६-४ एवढा झाला आहे. भारताला विजयासाठी आणखी ११९ रनची आवश्यकता आहे. लागोपाठ ३ विकेट गमावल्यानंतर विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेनं भारतीय डावाला आकार दिला. या दोघांमध्ये १०१ रनची पार्टनरशीप झाली. पण मोईन अलीनं ५८ रनवर कोहलीला आऊट केलं. अजिंक्य रहाणे ४४ रनवर नाबाद तर हार्दिक पांड्या शून्य रनवर नाबाद खेळत आहे.
इंग्लंडनं ठेवलेल्या २४५ रनचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताला सुरुवातीलाच तीन धक्के बसले. ओपनर लोकेश राहुल शून्य रनवर आऊट झाला. तर शिखर धवन १७ रनवर आणि पहिल्या इनिंगमध्ये शतक झळकावणारा चेतेश्वर पुजारा ५ रनवर आऊट झाला.
चौथ्या दिवसाची सुरुवात झाल्यानंतर इंग्लंडला फक्त ११ रन करता आल्या. भारताला पहिल्या इनिंगमध्ये २७ रनची आघाडी मिळाली होती. मोहम्मद शमीनं दिवसाच्या सुरुवातीलाच इंग्लंडला धक्का दिला आणि ब्रॉडला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. तर सॅम कुरन रन आऊट झाला.
भारताकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माला २ विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराह आणि अश्विनला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. इंग्लंडकडून जॉस बटलरनं सर्वाधिक ६९ रन केले तर जो रूटनं ४८ आणि सॅम कुरननं आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन महत्त्वपूर्ण ४६ रन केले.
५ टेस्ट मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं पहिल्या दोन टेस्ट मॅच गमावल्या होत्या. यानंतर तिसऱ्या टेस्टमध्ये जोरदार पुनरागमन करत भारतानं ही टेस्ट जिंकली होती. त्यामुळे भारत सीरिजमध्ये १-२नं पिछाडीवर आहे. सीरिजमधलं आव्हान कायम ठेवण्यासाठी भारताला ही टेस्ट जिंकणं आवश्यक आहे.