रांची | टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात दुसरा टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. हा सामना जिंकून मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज आहे. तर न्यूझीलंडसाठी 'करो या मरो'ची परिस्थिती आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज मार्टिन गुप्टीला टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. गुप्टीलला विराटचा टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावांचा विश्व विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. (india vs new zealand 2nd t 20 martin guptil need to 11 runs for break virat kohli most runs world record in t 20i)
फक्त 11 धावा
मार्टिनला हा रेकॉर्ड आपल्या नावे करण्यासाठी फक्त 11 धावांची आवश्यकता आहे. विराटला या टी 20 मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. विराटला देण्यात आलेली विश्रांती ही मार्टिनच्या खऱ्या अर्थाने पथ्यावर पडली, असं म्हंटलं तर वावगं ठरु नये.
विराट कोहली टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांच्या यादीत अव्वल स्थानी विराजमान आहे. विराटने आतापर्यंत 95 सामन्यांमधील 87 डावात 52.04 च्या सरासरीने 3 हजार 227 धावा केल्या आहेत. यामध्ये विराटने 29 अर्धशतक झळकावले आहेत. तर 94 ही त्याची सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे.
तर दुसऱ्या बाजूला गुप्टीलने 110 सामन्यात 32.49च्या एव्हरेजने 3 हजार 217 धावा केल्या आहेत. या दरम्यान गुप्टीलने 2 शतकं आणि 19 अर्धशतकं लगावली आहेत. यानंतर तिसऱ्या स्थानी टीम इंडियाचा नवनिर्वाचित टी 20 कर्णधार रोहित शर्मा आहे. रोहित शर्माने 117 मॅचेसमध्ये 32.82 एव्हरेजने 3 हजार 86 धावा चोपल्या आहेत. रोहितने यामध्ये 4 शतक आणि 24 अर्धशतक लगावलेत.
टीम इंडिया विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात धमाका
गुप्टीलने या टी 20 मालिकेतील जयपूर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात 42 चेंडूत 4 सिक्स आणि 3 चौकारांच्या मदतीने 70 धावा कुटल्या होत्या. मार्टिनचं टीम इंडिया विरुद्धचं हे पहिलंवहिलं अर्धशतक ठरलं
टी 20 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
विराट कोहली - 3 हजार 227 धावा.
मार्टिन गुप्टील - 3 हजार 217 धावा.
रोहित शर्मा - 3 हजार 86 धावा.
एरॉन फिंच - 2 हजार 608 धावा.
पॉल स्टर्लिंग - 2 हजार 570 धावा.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान, ईशान खान आणि ऋतुराज गायकवाड.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), टीम सायफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, टोड एस्टेल, लॉकी फर्गुयसन, ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशाम.