शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय

भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. 

Updated: Oct 24, 2018, 10:08 PM IST
शाय होपनं भारताचा विजय हिसकावला, रोमांचक मॅच टाय title=

विशाखापट्टणम : भारत आणि वेस्ट इंडिजमधली दुसरी वनडे टाय झाली आहे. भारतानं ठेवलेल्या ३२२ रनचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं ५० ओव्हरमध्ये ७ विकेट गमावून ३२१ रन केले. शाय होपनं १३४ बॉलमध्ये नाबाद १२३ रन केले. पण त्याला वेस्ट इंडिजला ही मॅच जिंकवता आली नाही. पहिल्या मॅचमध्ये शतकी खेळी करणाऱ्या हेटमेयरनं या मॅचमध्ये ६४ बॉलमध्ये ९४ रनची वादळी खेळी केली. भारताकडून कुलदीप यादवनं सर्वाधिक ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद शमी, उमेश यादव आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.

विराट कोहलीच्या खणखणीत शतकामुळे भारतानं वेस्ट इंडिजपुढे विजयासाठी ३२२ रनचं आव्हान ठेवलं आहे. विराटनं १२९ बॉलमध्ये नाबाद १५७ रनची खेळी केली. यामध्ये १३ फोर आणि ४ सिक्सचा समावेश होता. विराटचं वनडे क्रिकेटमधलं हे ३७वं शतक आहे. भारतानं ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमावून ३२१ रन केले. पहिल्या मॅचमध्येही विराटनं शतक केलं होतं.  पहिल्या मॅचमध्ये शतक करणारा रोहित शर्मा ४ रनवर आऊट झाला. अंबती रायुडूनं विराटला चांगली साथ दिली. रायुडूनं ८० बॉलमध्ये ७३ रनची खेळी केली.

वेस्ट इंडिजकडून नर्स आणि मॅकॉयनं प्रत्येकी २-२ विकेट घेतल्या. तर केमार रोच आणि मार्लोन सॅम्युअल्सला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला होता. ५ मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं जिंकली आहे.

विराट कोहलीनं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला आहे. वनडे क्रिकेटमध्ये विराटनं १० हजार रन पूर्ण केले आहेत. वनडे क्रिकेटमध्ये एवढ्या जलद १० हजार रन पूर्ण करणारा विराट पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. विराटनं २०५व्या इनिंगमध्ये हा टप्पा ओलांडला आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये विराटला हा टप्पा ओलांडायला ८१ रनची गरज होती. सचिन तेंडुलकरनं हे रेकॉर्ड २५९ इनिंगमध्ये केलं होतं.

वनडेत सर्वाधिक शतकं करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन तेंडुलकर याच्या नावावर वनडेमध्ये सर्वाधिक ४९ शतकांची नोंद आहे. वनडे क्रिकेटमध्ये १० हजार रन पूर्ण करणारा विराट १३वा खेळाडू बनला आहे.

याआधी वनडेमध्ये सचिन तेंडुलकर, कुमार संगकारा, रिकी पाँटिंग, सनथ जयसूर्या, महेला जयवर्धने, इंझमाम उल हक, जॅक कॅलिस, सौरव गांगुली, राहुल द्रविड, ब्रायन लारा, तिलकरत्ने दिलशान आणि एम.एस. धोनी यांनी वनडेमध्ये १० हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.