बर्मिंगहम : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचच्या पहिल्या इनिंगमध्ये विराटनं १४९ रनची तर दुसऱ्या इनिंगमध्ये ५१ रनची खेळी केली. विराट कोहलीच्या या शानदार खेळीनंतरही भारताच्या इतर बॅट्समननी निराशा केल्यामुळे या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला असला तरी विराट कोहलीच्या चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये विराट कोहली पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथला कोहलीनं मागे टाकलं आहे.
पहिल्या क्रमांकाबरोबरच विराटनं रेटिंगच्या बाबतीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनिल गावसकर आणि सचिन तेंडुलकरला मागे टाकलं आहे. विराट कोहलीकडे आयसीसी रेटिंगमध्ये ९३४ अंक मिळाले आहेत. कोणत्याही भारतीय खेळाडूला आत्तापर्यंत मिळालेले हे सर्वाधिक अंक आहेत. कोहलीआधी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, गौतम गंभीर, सुनिल गावसकर, विरेंद्र सेहवाग आणि दिलीप वेंगसरकर पहिल्या क्रमांकावर होते. सचिननंतर पहिल्या क्रमांकावर गेलेला विराट पहिलाच भारतीय आहे. २०११ साली सचिन आणि दक्षिण आफ्रिकेचा जॅक कॅलिस पहिल्या क्रमांकावर होते. पण लगेचच सचिन दुसऱ्या क्रमांकावर गेला होता.
लॉर्ड्स टेस्टमध्येही विराटनं चांगली कामगिरी केली तर तो आत्तापर्यंत सर्वाधिक रेटिंग असलेल्या टॉप १० खेळाडूंच्या यादीमध्ये येऊ शकतो. मॅथ्यू हेडन, जॅक कॅलिस आणि एबी डिव्हिलियर्स यांचे ९३५ रेटिंग होतं. तर सर डॉन ब्रॅडमन यांचं सर्वाधिक ९६१ एवढं रेटिंग होतं. या यादीमध्ये स्टिव्ह स्मिथ एकेकाळी ९४७ रेटिंगसह दुसऱ्या क्रमांकावर होता.
१ विराट कोहली, भारत- ९३४ रेटिंग
२ स्टिव्ह स्मिथ, ऑस्ट्रेलिया- ९२९ रेटिंग
३ जो रूट, इंग्लंड- ८६५ रेटिंग
४ केन विलियमसन, न्यूझीलंड- ८४७ रेटिंग
५ डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलिया- ८२० रेटिंग