Rohit Sharma Opening Partner : कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियममध्ये दुपारी 3 वाजता भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. आशिया कपमध्ये भारत आणि पाक हे दोन्ही संध दुसऱ्यांदा एकमेकांशी भिडणार आहेत. या सामन्यासाठी क्रिकेट चाहते फार उत्सुक आहेत. अशातच या सामन्यापूर्वी टीम इंडियामध्ये एक मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे. यावेळी पाकिस्तानविरूद्ध ओपनिंग जोडीमध्ये बदल होऊ शकतो.
भारत-पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यातील क्रिकेट सामना हा हायव्होल्टेज सामना मानला जातो. कोणत्याही मैदानावर या दोन टीममध्ये क्रिकेट सामना झाला की मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात. रविवारी म्हणजेच 10 सप्टेंबर रोजी कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर असंच वातावरण पाहायला मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सामना सुरू होईल
या सामन्यासाठी टीम इंडियात ( Team India ) एका दमदार खेळाडूचं कमबॅक होणार आहे. हा खेळाडू दुखापतीमुळे बराच काळ मैदानापासून दूर होता. त्यामुळे आजच्या सामन्यात हा खेळाडू म्हणजेच के.एल राहुलचा ( KL Rahul ) समावेश केला जाऊ शकतो. राहुलला IPL च्या सिझनमध्ये दुखापत झाली होती. त्यानंतर तो आता टीममध्ये परतला आहे. आगामी आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्येही केएल. राहुलचा समावेश करण्यात आला होता. दरम्यान आता राहुल कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, राहुलला ( KL Rahul ) प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यासाठी कोणत्या खेळाडूला बाहेर बसवणार? यामध्ये फलंदाजीच्या बाबतीत केएल राहुल कर्णधार रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma ) फलंदाजीला उतरणार असल्याची शक्यता आहे. जर या दोघांनी ओपनिंग केली तर तर संपूर्ण फलंदाजीचा क्रम बदलेल. अशा स्थितीत शुभमनला तिसऱ्या क्रमांकावर, विराटला चौथ्या क्रमांकावर उतरावं लागणार आहे. यानंतर पाचव्या क्रमांकावर इशानला पाठवलं जाऊ शकतं. मात्र दुसरीकडे राहुलला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावरही फलंदाजीला उतरवलं जाण्याची शक्यता आहे.
राहुल विकेटकीपर फलंदाज म्हणून खेळला तर इशान किशन किंवा श्रेयस अय्यरला टीममधून बाहेर बसावं लागू शकतं. श्रेयसही दुखापतीनंतर मैदानात परतला आहे. त्याला केवळ एका सामन्यात फलंदाजीची संधी मिळालीये. जर राहुलला या जागेवर खेळवलं तर ईशानला टीममध्ये स्थान मिळू शकतं. ईशानला टीममध्ये स्थान मिळण्याचं कारण तो फॉर्ममध्ये असणं हे आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन, केएल राहुल, हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव.