...म्हणून खेळाडूंकडूनच घेतले पैसे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हैराण करणारा निर्णय

कायमच हैराण करणारे निर्णय घेणारं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

Updated: Sep 15, 2020, 09:18 PM IST
...म्हणून खेळाडूंकडूनच घेतले पैसे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा हैराण करणारा निर्णय

कराची : कायमच हैराण करणारे निर्णय घेणारं पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. राष्ट्रीय टी-२० चॅम्पियनशीपमध्ये भाग घेणाऱ्या २४० खेळाडू, अधिकारी आणि संबंधित व्यक्तींच्या कोरोना टेस्टसाठीचे पैसे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मागितले आहेत. 

३० सप्टेंबरपासून रावळपिंडी आणि मुलतानमध्ये सुरु होणाऱ्या स्पर्धेसाठी सगळे खेळाडू आणि अधिकाऱ्यांना दोन कोरोना टेस्ट कराव्या लागणार आहेत. जर दोन्ही टेस्ट निगेटिव्ह आल्या तरच त्यांना स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. या टेस्टचे पैसे खेळाडू, अधिकारी आणि संबंधितांना स्वत:च द्यावे लागणार आहेत.

दुसरीकडे झिम्बाब्वेविरुद्धच्या सीरिजसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्ड बायो बबल सुरक्षेचा वापर करणार आहे. यासाठी पीसीबीने इंग्लंड क्रिकेट बोर्डाकडून सल्ला मागितला आहे. कोरोनाच्या संकटात इंग्लंडने बायो बबल सुरक्षेमध्येच वेस्ट इंडिज, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धची सीरिज खेळवली होती. 

झिम्बाब्वेची टीम २० ऑक्टोबरला पाकिस्तानमध्ये पोहोचणार आहे. त्यानंतर दोन्ही टीममध्ये टी-२० आणि वनडे मॅचची सीरिज होणार आहे. यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. कोरोनामुळे दोन्ही ठिकाणी बायो बबल सुरक्षा देण्यात येत आहे.