Rachin Ravindra break Sachin Tendulkar record : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडसाठी एक नवा खेळाडू उदयाला आला आहे. त्याचं नाव रचिन रविंद्र.. वर्ल्ड कप 2023 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रचिन रवींद्र (Rachin Ravindra) तिसऱ्या क्रमांकावर आहे. 74.7 1ची सरासरी आणि 107.39 च्या स्ट्राईक रेटने त्याने धावा कुटल्या आहेत. त्यामुळे न्यूझीलंडसाठी (New Zealand) तो हुकमी एक्का ठरतोय, हे पक्कं झालंय. अशातच आता रचिन रविंद्रने क्रिकेटच्या देवाचा विक्रम मोडूस काढला आहे. सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) वयाच्या 25 वर्षापूर्वीच वर्ल्ड कपमध्ये 523 धावा केल्या होत्या. त्यांचा हा विक्रम फार काळ कोणीही मोडू शकलं नव्हतं. रचिन रवींद्रने गेल्या सामन्यात या विक्रमाची बरोबरी केली होती. 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत त्याने आतापर्यंत 523 धावा केल्या होत्या. आता श्रीलंकेविरुद्ध सामन्यात (New Zealand vs Sri Lanka) रचिन रविंद्रने सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला आहे.
सचिन तेंडुलकरने कसोटीत 14,000 धावा पूर्ण केल्या तेव्हा मी बेंगळुरूच्या स्टँडवर होतो. तेव्हा मी 10 वर्षांचा होतो, सचिनसारख्या पिढीतील प्रतिभेचा साक्षीदार होणे माझ्यासाठी खरोखरच खास होतं, असं रचिन रवींद्र याने म्हटलं आहे. मी भारतीय वंशाचा असल्याचा मला अभिमान आहे. माझ्या आईवडिलांचा जन्म ज्या देशात झाला, ते ज्या देशात वाढले आणि ज्या देशात माझे अनेक नातेवाईक आहेत, तिथं मी शतक करू शकलो याची मला आनंद आहे, असं रचिनने म्हटलं होतं.
रचिनचे वडिल सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविडचे खूप मोठे फॅन आहेत. त्यांनी लहानपणापासून सचिन अन् द्रविड यांना खेळताना पाहिलंय. रचिनचे वडिल अनिवासी भारतीय आहेत. त्याच्या वडिलांनी राहुल द्रविड यांच्या नावातून र आणि सचिन तेंडुलकरच्या नावातून चिन घेत आपल्या मुलाचं नाव रचिन रविंद्र ठेवले होते. तोच आज रचिन रविंद्र हा सचिनच्या विक्रमाची तोडफोड करत आहे, तर हा क्षण त्याच्या वडिलांसाठी सुद्धा एक सुवर्णक्षण असेल यामध्ये शंका नाही.
दरम्यान, न्यूझीलंडसमोर आज श्रीलंकेचे आव्हान आहे. बंगळूरच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कुसल परेराच्या 51 धावा वगळता एकही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. तर न्यूझीलंडकडून बोल्टने तीन विकेट घेतल्या, तर फर्ग्युसन आणि मिशेल सँटनेरने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.