मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातली निर्णायक वनडे मॅच २२ डिसेंबरला खेळवण्यात येणार आहे. पहिल्या वनडे मॅचमध्ये वेस्ट इंडिजने भारताला पराभवाचा धक्का दिला. यानंतर भारताने जोरदार पुनरागमन करत दुसऱ्या वनडेमध्ये दणदणीत विजय मिळवला. आता कटकमध्ये खेळवण्यात येणाऱ्या मॅचवरच सीरिजचा निकाल अवलंबून असणार आहे.
विशाखापट्टणमच्या वनडेमध्ये भारताने विजय मिळवला असला तरी भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने भारतीय टीम प्रशासनाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहलला एकत्र का खेळवलं जात नाही? हाच न्याय तुम्ही विराट आणि रोहितला लावाल का? असा प्रश्न सेहवागने विचारला आहे.
'कुलदीप यादव आणि चहल यांना एकत्र खेळून बराच काळ झाला आहे. जशाप्रकारे बॅट्समन पार्टनरशीप करुन रन काढतो, तसंच बॉलरही पार्टनरशीपमध्ये विकेट घेतात. कुंबळे आणि हरभजन आमच्यासाठी अस्त्र असायचे. दोन्ही बाजूंनी ते रन रोखायचे, त्यामुळे दबाव वाढायचा आणि विकेट मिळायची. कुलदीप आणि चहलही असं करु शकतात, पण कर्णधार वेगळाच विचार करत आहे,' असं सेहवाग म्हणाला.
'एखादा बॉलर चांगली बॉलिंग करत असेल, तर त्याला विश्रांती का दिली जाते? तुम्ही असं विराट, रोहित किंवा शिखरसोबत करत नाही. तुम्ही बॅट्समनना बाहेर ठेवत नाही, पण बॉलरना मात्र अशी वागणूक दिली जाते. एखादा बॅट्समन ४ इनिंगमध्ये अपयशी ठरला, तर त्याला पाचवी इनिंग मिळते. पण बॉलरला मात्र २ इनिंगच मिळतात,' असं वक्तव्य सेहवागने केलं.
'मागच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या सीरिजमध्ये कुलदीप आणि चहलने प्रभाव पाडला होता. या गोष्टीही लक्षात ठेवल्या पाहिजेत. भविष्याचा विचार करण्यासाठी दुसऱ्या खेळाडूला खेळवत असल्याचं सांगितलं जातं. पण हे विराट आणि रोहित, राहुल, धवनला का सांगितलं जात नाही? मनिष पांडेला या खेळाडूंच्या बदली संधी का दिली जात नाही? तुम्ही बॅट्समन आणि बॉलर यांच्यात फरक करु नका,' असा सल्ला सेहवागने दिला आहे.