शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा दिल्लीकडून खेळणार

भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे.

Updated: Nov 5, 2018, 08:02 PM IST
शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा दिल्लीकडून खेळणार title=

नवी दिल्ली : भारताचा ओपनर शिखर धवन आयपीएलमध्ये पुन्हा एकदा दिल्लीच्या टीमकडून खेळताना दिसणार आहे. हैदराबादच्या टीमनं शिखर धवनला दिल्लीच्या टीमला ट्रान्सफर केलं आहे. शिखर धवननं आयपीएलची सुरुवात दिल्लीच्या टीमकडूनच केली होती. २००८ साली धवन दिल्लीच्या टीममध्ये होता. सध्या तो हैदराबादच्या टीमकडून खेळत होता. शिखर धवनला टीममध्ये घ्यायच्या बदल्यात दिल्लीनं विजय शंकर, अभिषेक शर्मा आणि शाहबाज नदीमला सोडून दिलं आहे.

हैदराबादच्या टीमनं ट्विटरवरून याची माहिती दिली आहे.

तर दुसरीकडे दिल्लीच्या टीमनं त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शिखर धवनचं स्वागत केलं आहे.

हैदराबादनं लिलावामध्ये शिखर धवनला ५.२ कोटी रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. शिखर धवन त्याच्या या किंमतीवरून खुश नव्हता. तसंच हैदराबादचे प्रशिक्षक टॉम मुडी यांच्यासोबतही धवनचे वाद झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. दिल्लीनं विजय शंकर, शाहबाज नदीम आणि अभिषेक शर्मा यांना एकूण ६.९५ कोटी रुपयांना विकत घेतलं होतं. आता या तिघांना टीममध्ये घेण्यासाठी हैदराबादला धवनची रक्कम (५.२ कोटी) घटवून बाकीची रक्कम दिल्लीला द्यावी लागणार आहे.

२००८ साली दिल्लीकडून खेळल्यानंतर धवन मुंबईसाठी खेळला. यानंतर त्याला हैदराबादच्या टीमनं विकत घेतलं. धवननं हैदराबादकडून खेळताना सर्वाधिक रन केले आहेत. धवननं ९१ इनिंगमध्ये ३५.०३ च्या सरासरीनं २,७६८ रन केले आहेत. मागच्या वर्षी धवननं ३५.५० च्या सरासरीनं ४९७ रन केले होते.

१५ नोव्हेंबरपर्यंत आयपीएल फ्रॅन्चायजीना दुसऱ्या फ्रॅन्चायजींसोबत खेळाडू अदलाबदली करता येणार आहेत.