वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत

वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे.

Updated: Jul 16, 2019, 07:45 PM IST
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाची १९ जुलैला निवड, मोठ्या बदलांचे संकेत title=

मुंबई : वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये पराभूत झालेली टीम इंडिया आता वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची शक्यता आहे. १९ जुलैला वेस्ट इंडिज दौऱ्यासाठीच्या टीम इंडियाची निवड होणार आहे. ३ ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्याला सुरुवात होईल. या दौऱ्यात टीम इंडिया ३ टी-२०, ३ वनडे आणि २ टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे.

टी-२० आणि वनडे दौऱ्यासाठी विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांना आराम दिला जाऊ शकतो. तर धोनी निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत, पण याबाबत कोहली, धोनी किंवा बीसीसीआयकडून कोणतंही वक्तव्य करण्यात आलेलं नाही.

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनी आणि आवेश खान या फास्ट बॉलरपैकी काहींना संधी मिळू शकते. दीपक चहरने यंदाच्या आयपीएलच्या १७ मॅचमध्ये २२ विकेट घेतल्या. तर खलीलला १९ विकेट मिळाल्या. स्पिनरमध्ये राहुल चहर, मयंक मार्कंडे आणि श्रेयस गोपाळ यांच्या नावाची चर्चा आहे. बॅटिंगमध्ये शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांची निवड होऊ शकते. गिलने आयपीएलमध्ये २९६ रन केले होते.

२२ ऑगस्टपासून टेस्ट सीरिजला सुरुवात होणार आहे. ही टेस्ट सीरिज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा भाग आहे. या टेस्ट सीरिजमध्ये विराट आणि बुमराह खेळतील हे जवळपास निश्चित आहे.